अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांची कायदेशीर सल्लागारांची टीम तयार करत असून राष्ट्राध्यक्षांचे सहायक अधिवक्ता म्हणून त्यांनी हरमीत ढिल्लो (वय ५४) या शीख वकील महिलेची निवड जाहीर केली आहे. हरमीत ढिल्लो यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्या लहान असतानाच त्यांचे वडील डॉ. तेजपाल सिंह ढिल्लो हे अमेरिकेला स्थायिक झाले होते. हरमीत ढिल्लों यांची अमेरिकेच्या न्याय खात्यातील नागरी हक्कांसाठी सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. ट्रम्प म्हणाले, ‘हरमीत ढिल्लों यांची अमेरिकेच्या न्याय विभागात नागरी हक्कांसाठी सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. जन्माने शीख असलेल्या ढिल्लों या डार्टमाउथ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया लॉ स्कूलमध्ये शिकल्या असून त्यांनी अमेरिकेच्या फोर्थ सर्किट कोर्ट ऑफ अपील्समध्ये काम केले आहे. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत हरमीत या नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सातत्याने उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालण्याविरोधात मोठ्या तंत्रज्ञानाचा सामना केला, कोविड दरम्यान एकत्र प्रार्थना करण्यापासून रोखलेल्या ख्रिश्चनांचे प्रतिनिधित्व केले तसेच आपल्या कामगारांशी भेदभाव करण्यासाठी कंपन्यांवर खटले दाखल केले होते.’
हरमीत या अमेरिकेतील आघाडीच्या वकिलांपैकी एक असून निवडणुकीदरम्यान केवळ कायदेशीर मतांची मोजणी व्हावी यासाठी त्यांनी लढा उभारला होता.
‘हरमीत या अमेरिकास्थित शीख धार्मिक समुदायाच्या आदरणीय सदस्य आहेत. आता अमेरिकेच्या न्याय विभागात आपल्या नव्या भूमिकेत हरमीत आपल्या घटनात्मक अधिकारांचे रक्षक करतील. तसेच आमचे नागरी हक्क आणि निवडणूक कायदे निष्पक्षपणे आणि ठामपणे अंमलात आणतील’, असं नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
जुलै महिन्यात अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ढिल्लो यांनी अरदास पाठ केला होता. तेव्हा त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात आली होती. गेल्या वर्षी रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. २०१६ मध्ये क्लीव्हलँड येथे झालेल्या जीओपी कन्व्हेन्शनच्या व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन ठरल्या होत्या.
दरम्यान, सहायक अधिवक्तेपदी निवड केल्याबद्दल हरमीत ढिल्लो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहे. 'देशाचा नागरी हक्कांचा अजेंडा ठरविण्यामध्ये मदत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माझे नामांकन केल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. आपल्या महान देशाची सेवा करण्यास मी सक्षम असून हे माझे स्वप्न होते. अशी प्रतिक्रिया ढिल्लो यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिली आहे.
संबंधित बातम्या