Indian Immigrants : बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी सुरू! २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान निघाले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Immigrants : बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी सुरू! २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान निघाले

Indian Immigrants : बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी सुरू! २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान निघाले

Feb 04, 2025 02:20 PM IST

US Deports 205 Indian Immigrants : डोनाल्ड ट्रम्प सरकारनं बेकायदा परदेशी स्थलांतरितांना देशाबाहेर काढणं सुरू केलं आहे. भारतीयांनाही याचा फटका बसत आहे.

बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी सुरू! २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान निघाले
बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी सुरू! २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान निघाले

Indian Immigrants News in Marathi : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे पुन्हा हातात घेतल्यानंतर 'अमेरिका फर्स्ट' धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. व्यावसायिक स्तरावर टॅरिफची अंमलबजावणी केल्यानंतर आता ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांकडं मोर्चा वळवला आहे. भारतालाही याचा फटका बसला आहे. अमेरिकी लष्कराचे सी-१७ विमान बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन रवाना झालं आहे.

 रॉयटर्सने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, विमानात २०५ भारतीय स्थलांतरित आहेत. ट्रम्प प्रशासनानं १८ हजार भारतीयांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून घोषित केलं आहे. त्यातील पहिल्या २०५ जणांना भारतात पाठवल्याचं समजतं.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा एक व्यापक रणनीतीचा भाग मानला जात आहे. अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्यानं एएनआयला सविस्तर काही सांगण्यास नकार दिला. 'भारतात पाठवण्यात आलेल्या विमानाबद्दल अनेक लोक चौकशी करत आहेत. मी त्याबद्दल कोणतीही माहिती सामायिक करू शकत नाही, परंतु मी रेकॉर्डवर सांगू शकतो की अमेरिका आपल्या सीमा सुरक्षेच्या बाबतीत अधिक सतर्क झाली आहे. इमिग्रेशन कायदे कडक करीत आहे आणि अवैध स्थलांतरितांना काढून टाकत आहे. बेकायदा स्थलांतरितांचा धोका आम्ही आता पत्करू शकत नाही हेच यातून आम्हाला सांगायचं आहे, असं तो प्रवक्ता म्हणाला.

 स्थलांतरितांच्या परत पाठवणीसाठी लष्करी मदत

ट्रम्प यांनी आपला इमिग्रेशन अजेंडा राबविण्यासाठी लष्करी मदतीची मागणी केली आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त जवान तैनात करण्याबरोबरच हद्दपारीसाठी लष्करी विमानांचा वापर करणं या दिशेनं पावलं उचलण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या स्थलांतरितांना ठेवण्यासाठी लष्करी तळांचाही वापर केला जात आहे.

…तर भारत 'बेकायदेशीर स्थलांतरितांना' परत घेईल!

बेकायदा स्थलांतरितांचं नागरिकत्व तपासून ते भारतीय आढळल्यास त्यांना परत घेतलं जाईल, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं याआधीच स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या नव्या सरकारसोबत काम करण्याची आणि व्यापारयुद्ध टाळण्याची तयारी भारत सरकारनं वारंवार दर्शवली आहे.

पेंटागॉनने ५,००० हून अधिक स्थलांतरितांना केले हद्दपार

पेंटागॉननं एल पासो (टेक्सास) आणि सॅन डिएगो (कॅलिफोर्निया) येथील अमेरिकी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ५,००० हून अधिक स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी विमानं उपलब्ध करून दिली आहेत. आतापर्यंत ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथील स्थलांतरितांना लष्करी विमानांतून नेण्यात आलं आहे.

स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी लष्करी उड्डाणं हा महागडा पर्याय आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ग्वाटेमाला इथं धाडण्यात आलेल्या विमानाला प्रति स्थलांतरित किमान ४,६७५ डॉलर खर्च येण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर