चिनी कंपन्यांचा हेराफेरी आणि ग्राहकांच्या फसवणुकीशी फार जुना संबंध राहिला आहे. सोशल मीडियावर चिनी कंपन्यांशी संबंधित अनेक मजेशीर मीम्स तुम्ही पाहिले असतील. आता अमेरिकेतील एका व्यक्तीने याचे जिवंत उदाहरण नुकतेच अनुभवले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला त्याने मागवलेल्या मालाच्या बदल्यात ऑर्डर केलेल्या त्या वस्तूंचे छापील छायाचित्र देण्यात आले. पार्सल उघडताच त्या व्यक्तीला धक्काच बसला.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ६८ वर्षीय सिल्वेस्टर फ्रँकलिन यांनी नोव्हेंबरमध्ये चिनी ऑनलाइन मार्केट प्लेस अली एक्सप्रेसमधून (AliExpress) प्रेशर वॉशर असलेले ड्रिल मशीन सुमारे ४० डॉलरमध्ये खरेदी केले होते. त्या माणसाला वाटलं की कमी पैशात आपल्याला चांगली वस्तू मिळाली . मात्र, वस्तू हातात पडताच त्याला धक्का बसला.
डिसेंबरमध्ये जेव्हा त्या व्यक्तीला माल मिळाला तेव्हा प्रत्यक्ष ड्रिलऐवजी कंपनीने ड्रिलिंग मशिनचा छापील फोटो आणि स्क्रू पाठवल्याचे पाहून तो स्तब्ध झाला. त्यानंतर फ्रँकलिन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'मी सुमारे ४० डॉलर दिले. मला नुकताच ड्रिलचा फोटो मिळाला. मी स्तब्ध झालो. परताव्यासाठी मी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. तथापि, फ्रँकलिनला हे देखील करणे कठीण जात आहे. फ्रँकलिनने किरकोळ विक्रेत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप परतावा मिळालेला नाही.
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने उपहासाने म्हटले की, "किमान त्यांनी स्क्रू तरी पाठवायचा." आणखी एका युजरने उपहासाने लिहिले, "AliExpress ने योग्य केले. तुम्हाला आणखी काय हवे होते? त्यांनी संपूर्ण ड्रिल पाठवली... 2D मध्ये।” अन्य एका यूजरने लिहिले की, जर त्यांनी पैशांची प्रिंट केली तर त्यांना रिफंड मिळू शकतो.
अली एक्सप्रेस ही अलिबाबाची उपकंपनी आहे आणि तिला "चीनचे अॅमेझॉन" म्हणून संबोधले जाते. याआधीही अनेक संशयास्पद कारवायांमुळे त्यावर टीका झाली आहे. बेटर बिझनेस ब्युरोच्या म्हणण्यानुसार, अलीएक्सप्रेसला डी रेटिंग आहे आणि हजारो खरेदीदारांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्यात अपयशी ठरली आहे.
संबंधित बातम्या