Illegal Indian Migrants : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १०४ भारतीय देशात परत आले आहेत. त्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवके जाणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, लवकरच त्यांना भारतात परत पाठवले जाणार आहे. याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिकेने २९५ लोकांची यादी भारतात पाठवली आहे, जे अमेरिकेत अवैधरित्या राहत होते. त सर्वांना पुन्हा भारतात परत पाठवले जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकेतून हद्दपार करण्यासाठी ४८७ भारतीय नागरिकांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील २९५ जणांची माहिती भारताला देण्यात आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे.
ही नियमित प्रक्रिया आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल संसदेत स्पष्ट केलं होतं. भारत या प्रकरणी अमेरिकेला सहकार्य करत आहे. कोणत्याही देशाला हद्दपार करण्यात येणारी व्यक्ती आपले नागरिक आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची असते. त्याशी संबंधित कायदेशीर आणि सुरक्षेशी संबंधित मुद्देही आहेत.
अमेरिकेने ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची माहिती दिली आहे. भारत सरकारने अधिक माहितीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत अमेरिकेने २९८ व्यक्तींची माहिती दिली. ते म्हणाले की, भारत पूर्ण पारदर्शकता राखत असून या प्रकरणी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे.
अमेरिकेत बेकायदेशिर राहणाऱ्या भारतीयांना परत मायदेशी पाठवतांना हातात बेड्या घालून हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारचे वर्तन टाळता आले असते. तसेच भारतीयांची अशा पद्धतीचे गैरवर्तन टाळता आले असते, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले. अमेरिकेने बेकायदा भारतीय स्थलांतरितांना ४० तासांच्या लष्करी विमानाने परत पाठवल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी हे वक्तव्य केले आहे. स्थलांतरितांना पाठवण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मिस्री म्हणाले की, आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांकडे या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे वर्तन टाळले जाऊ शकते, असे देखील बोलले गेले आहे.
बेकायदेशीर स्थलांतरितांना हातपायात बेड्या घालण्याचे अमेरिकेचे धोरण २०१२ पासून आहे, असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. भारताने २०१२ मध्ये बेकायदा स्थलांतरितांना बेड्या घालून हद्दपार करण्याविरोधात आपला निषेध नोंदवला होता का, असे विचारले असता परराष्ट्र सचिव म्हणाले, 'मला वाटत नाही की त्यावेळी या बाबत काही विरोध झाला असावा. या प्रकरणी आक्षेप घेण्यात आल्याची आमच्याकडे कोणतीही नोंद नाही. मिस्त्री यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संसदेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला.
संबंधित बातम्या