US Attack on Syria : अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी वायव्य सीरियात भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी मोहम्मद सलाह अल-जबीर हा ठार झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला. जबीर अल कायदाशी संलग्न असलेल्या हुरास अल-दीन नावाच्या गटाशी संबंधित होता.
दरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलच्या हवाई हल्ल्यात त्यांचा लष्करप्रमुख मोहम्मद दाईफ ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) त्याची हत्या झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेनंतर काही महिन्यांनी हमासने या घटनेला दुजोरा दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झालं आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हमासचे प्रवक्ते अबू ओबेदा यांनी एका व्हिडिओ स्टेटमेंटद्वारे दाईफच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
इस्रायलने ऑगस्ट २०२३ मध्ये जाहीर केलं होतं की १३ जुलै रोजी खान युनिस भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद दाईफ ठार झाला होता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यात १२०० हून अधिक लोक मारले गेले होते. त्यात बहुतांश सामान्य नागरिक होते. तर २०० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले होते. इस्रायलने हमासला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये ४६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना ठार केले.
अलीकडेच इस्रायल आणि हमास यांनी गाझामध्ये शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली होती. या करारानुसार बंधक आणि कैद्यांची देवाणघेवाण होते. गुरुवारी हमासने ११० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायलमधील ८ बंधकांची सुटका केली. यामध्ये ५ थाई शेतमजूर आणि ३ जर्मन-इस्रायली नागरिकांचा समावेश होता.
संबंधित बातम्या