नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप ट्रकने जमावाला धडक दिली आणि लोकांना चिरडले. या घटनेदरम्यान चालकाने जमावावर गोळीबारही केला.
ही घटना बोर्बन स्ट्रीट आणि इबरव्हिल च्या चौकात पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. हे ठिकाण आपल्या गजबजलेल्या नाईटलाईफ आणि चैतन्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखले जाते. मोठ्या संख्येने लोक नववर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर जमले होते. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांची वक्तव्ये आणि सोशल मीडिया पोस्टवरून हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे दिसून येत आहे.
व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रांमध्ये पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका चौकाभोवती उभी असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चालकावर गोळीबार केल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असून चालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डब्ल्यूजीएनओने दिलेल्या माहितीनुसार, न्यू ऑरलियन्समधील बॉर्बन स्ट्रीट आणि इबरव्हिल च्या चौकाजवळ पहाटे सव्वातीनच्या सुमारास एसयूव्हीने पादचाऱ्यांना धडक दिली. बोरबॉन स्ट्रीट बंद करण्यात आला असून आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. नोला रेडी यांनी लोकांना या भागापासून दूर राहण्याचे निर्देश दिले.
प्रत्यक्षदर्शींनी सीबीएस न्यूजला सांगितले की, बोर्बन स्ट्रीटवर भरधाव वेगाने एका ट्रकने जमावाला धडक दिली. यानंतर एका ड्रायव्हरने गाडीतून बाहेर पडून गोळीबार सुरू केला त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, सोशल मीडिया साइट एक्सवरही या दुर्घटनेत किमान १० किंवा त्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात आणखी एका कार हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. मॅग्डेबर्गमधील हा हल्ला सौदी वंशाच्या एका व्यक्तीने केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. न्यू ऑरलियन्समध्ये घडलेल्या या घटनेमुळे सणासुदीचे वातावरण शोकाकुल झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहून अफवा टाळाव्या, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
फ्रेंच क्वार्टरमध्ये वसलेले बॉर्बन स्ट्रीट हे न्यू ऑरलियन्समधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. बॉर्बन स्ट्रीटवर झालेल्या नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हजारो लोकांनी गर्दी केल्याचे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या