वंशाला दिवा म्हणून मुलाच्या हव्यासापोटी मुलींची हत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र मध्य प्रदेशमध्ये मुलगी पाहिजे म्हणून मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बैतूल येथे एका व्यक्तीने मुलगी पाहिजे म्हणून मुलाची हत्या केली. आरोपीने आधी पत्नीला बेदम मारहाण केली व त्यानंतर १२ दिवसाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना बैतूल येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरवाडा गावातील आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपी अनिल उइके दोन मुलांचा बाप आहे. मोठा मुलगा सात वर्षांचा तर लहान मुलगा पाच वर्षांचा आहे. त्याची पत्नी रुचिका तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर त्याला आशा होती कि, आता मुलगी होईल.
काही दिवसापूर्वी रुचिकाने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. यानंतर अनिल रागात होता. रविवारी सायंकाळी तो दारूच्या नशेच घरी परतला व पत्नीसोबत भांडू लागला. आरोपीने यासाठी पत्नीला दोषी मानत तिला बेदम मारहाण केली. त्याच्या तावडीतून सुटून रुचिका घरातून बाहेर पळून गेली. काही वेळाने झोपडीत परतली तेव्हा तिला दिसले की, नवजात मुलगा मृतावस्थेत पडला आहे. त्याच्या गळ्यावर दाबल्याचे निशाण होते.
त्यानंतर पोलिसांना सुचना देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याला आधीच दोन मुले आहेत. त्यामुळे त्याला मुलीची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्यांदाही मुलगाच झाल्याने त्याला सहन झाले नाही व त्याने त्याची हत्या केली.