UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (UPSC Result) मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नागौर जिल्ह्यातील मोडिकला गावातील मृणालिका राठौड या तरुणीने १२५ वी रँक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेला गवसणी घातली आहे. मृणालिकाने चार वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. मृणालिकाने कोणतीही कोचिंग न घेता भारतातील सर्वात खडतर परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सलग चार प्रयत्नात ती पूर्व परीक्षेतही यश मिळवू शकली नव्हती. मात्र चार वेळा अपयश मिळूनही खचून न जाता तिने अभ्यास सुरू ठेवला. कठोर मेहनत व चिकाटीच्या बळावर तिने पाचव्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आहे.
मृणालिका कुटूंबासह जयपूरमध्ये राहते. तिच्या वडिलांचे ८ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. मृणालिका जयपूरमधील वैशाली नगर परिसरातील एका खासगी शाळेतून १२ वीत सीबीएसई बोर्डात जिल्हा टॉपर राहिली होती. ग्रॅज्युएशनसाठी तिने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिने सांगितले की, दररोज ती ५ ते ६ तास अभ्यास करत होती.
सिविल सर्विसेज परीक्षेत नागौर येथील रहिवासी मृणालिका राठोडने १२५ वी रँक मिळवली आहे. सध्या ती जयपूरमध्ये रहात आहे. यूपीएससी पास झाल्यानंतर मृणालिकाने सांगितले की, ती महिला आणि पुरुषांमधील असमानता संपवण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. तिचे वडील नाथू सिंह राठोड यांनी हातगाडीवर भाज्या विकून मृणालिकाला शिकवले. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. मात्र कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. मृणालिकाची आई उज्ज्वला राठोड यांनी म्हटले की, प्रत्येक मुलींमध्ये समाजात काही तरी करून दाखवण्याची क्षमता असते. मृणालिकाच्या यशाने तिच्या मूळ गावात आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आणि अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. तर, देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in येथे आपला निकाल पाहू शकतात. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय परराष्ट्र सेवा यासह केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील एकूण १ हजार १०५ रिक्त जागा भरण्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे उद्दिष्ट आहे.