UPSC Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आणि अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. तर, देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. या परिक्षेत महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in येथे आपला निकाल पाहू शकतात. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय परराष्ट्र सेवा यासह केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील एकूण १ हजार १०५ रिक्त जागा भरण्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील समीर प्रकाश खोडेने ४२वा, नेहा राजपूत यांनी ५१वा आणि अनिकेत हिरडे यांनी ८१ वा क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी- एप्रिल २०२४ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. एकूण ३५५ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
१) आदित्य श्रीवास्तव
२) अनिमेश प्रधान
३) डोनुरू अनन्या रेड्डी
४) पी. के. सिद्धार्थ रामकुमार
५) रुहानी
६) सृष्टी दाबास
७) अनमोल राठोड
८) आशिष कुमार
९) नौशीन
१०) ऐश्वर्यम प्रजापती
आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. भारतीय प्रशासन सेवा या सेवेत शासनाकडे एकूण १८० जागा रिक्त आहेत. तर, भारतीय विदेश सेवा (३७ जागा), भारतीय पोलिस सेवा (२०० जागा), केंद्रीय सेवा गट अ (६१३ जागा) आणि केंद्रीय सेवा गट ब ११३ जागा रिक्त आहेत.