Uttar Pradesh Teacher News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सायबर गुन्हेगारांमुळे एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. सायबर गुन्हेगारांनी महिलेला तुमची मुलगी सेक्स स्कँडलचा भाग असल्याची माहिती दिली. तसेच हा प्रकार उघड न करण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. हे ऐकल्यानंतर महिला अस्वस्थ झाली आणि त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला. ही घटना तिच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृताचा मुलगा दीपांशू राजपूत याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, आई मालती वर्मा (वय, ५८) आग्रा येथील अछनेरा येथील ज्युनिअर हायस्कूलमध्ये सरकारी शिक्षिका होत्या. दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला, ज्यामध्ये आपली मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्या सांगितले आणि मुलीची ओळख उघड केल्याने भविष्यात होणाऱ्या परिणामांबद्दल तिला धमकावण्यास सुरुवात केली.
महिला शिक्षिकेच्या मुलाने दिलेल्या महितीनुसार, ‘फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला पोलीस इन्स्पेक्टर असल्याचे भासवले, त्यानंतर आईने मला फोनद्वारे माहिती दिली. पण जेव्हा मी फोन नंबर तपासला तेव्हा मी आईला सांगितले की, हा सायबर गुन्हेगारांचा फ्रॉड कॉल आहे. त्यानंतर मी माझ्या बहिणीशीही बोललो आणि सर्व काही नॉर्मल वाटले. मी माझ्या आईला काळजी करू नको, असे सांगितले. परंतु, सायबर गुन्हेगाराच्या फोनमुळे ती नैराश्यात गेली होती आणि तिची तब्येत बिघडली.’
‘शाळेतून घरी परतल्यानंतर तिला छातीत दुखू लागले. काही वेळानंतर तिची तब्येत जास्त बिघडली. आम्ही तिला जवळच्या रुगणालयात घेऊन गेलो, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले’, अशी माहिती दीपांशू यांनी दिली. जगदीशपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदवीर सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्हाला या प्रकरणी कुटुंबाकडून तक्रार मिळाली आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल.’
डिजिटल अरेस्ट म्हणजे जेव्हा एखाद्याला घाबरून किंवा धमकावून त्यांची फसवणूक केली जाते. तसेच बदनामी करण्याच्या भितीने त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, ज्याला डिजिटल अरेस्ट असे म्हणतात.
संबंधित बातम्या