Pilibhit lok Sabha BJP candidate : उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे खासदार वरुण गांधी यांना भाजप नेतृत्वानं जोरदार धक्का दिला आहे. वरुण गांधी यांंना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वरुण गांधी व त्यांच्या मातोश्री मनेका गांधी या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. मनेका गांधी यांनी भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं आहे. त्या सध्या सुलतानपूरच्या खासदार आहेत. तर, वरुण गांधी हे पिलिभित लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. वरुण यांचं तिकीट कापताना पक्षानं मनेका यांना सुलतानपूरमधून पुन्हा तिकीट दिलं आहे.
वरुण गांधी हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, पक्षानं त्यांना अजिबात महत्त्व दिलं नाही. गेल्या काही काळात वरुण गांधी यांनी शेतकरी आंदोलन व तरुणांच्या प्रश्नांवर बेधडक भूमिका मांडल्या होत्या. प्रसंगी त्यांनी केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवरही टीका केली होती. त्यामुळंच वरुण गांधी यांचा पत्ता कापला जाण्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे.
वरुण गांधी यांच्या जागी भाजपनं जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. जितिन हे एकेकाळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे सुपुत्र आहेत. केंद्रातील सत्ताबदलानंतर जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते सध्या योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. पीडब्ल्यूडीसारखं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं आहे.
भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या चारही उमेदवार याद्यांमध्ये नाव नसल्यामुळं आपला पत्ता कापला जाणार असल्याचे संकेत वरुण गांधी यांना मिळाले होते. त्यामुळं त्यांनी समाजवादी पक्षाशी जवळीक साधली होती. मात्स, अखिलेश यादव यांनी पिलीभीतमधून आधीच उमेदवार घोषित केला आहे. त्यामुळं आता वरुण गांधी पिलीभीतमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
वरुण गांधी हे मागील १५ वर्षांपासून पिलीभीतचं नेतृत्व करत आहेत. त्याआधी त्यांच्या मातोश्री मनेका गांधी इथून खासदार होत्या. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. याशिवाय, वरुण गांधी हे आक्रमक हिंदुत्वाचीही भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळं भाजपचा मतदार त्यांच्याशी जोडला गेला आहे. तरुणांमध्येही त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. भाजपनं त्यांचं तिकीट नाकारून चूक केल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. वरुण हे अपक्ष लढल्यास त्यांच्या प्रतिमेचा भाजपला मोठा फटका बसू शकतो, असंही बोललं जात आहे.