Kawad Yatra 2023 In Uttar Pradesh : उत्तर भारतातील अनेक राज्यांतून कावड यात्रा जात असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यूपीतील ज्या मार्गांवरून कावड यात्रेकरू जाणार आहे, त्या मार्गांवर चिकन, मटण, मांस आणि मद्यविक्री तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेचा आदर ठेवण्यासाठी मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून अनेक ठिकाणी स्वच्छतेची कामं हाती घेण्यात आल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तसेच कावड यात्रेकरूंच्या मार्गांवर पथदिवे आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आल्याचं यूपी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतून कावड यात्रा मार्गस्थ होत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि त्यानंतर उत्तराखंडच्या दिशेने कावड यात्रा दाखल होणार आहे. त्यापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये मांसविक्री तसेच मद्यविक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. दोन समाजात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कावड यात्रेकरूंच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ज्या मार्गांवर यात्रेकरू जाणार आहे, तेथील वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळं आता यूपीतील अनेक भागांमध्ये मांस आणि मद्यविक्री बंद करण्यात आल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच यात्रेकरूंच्या मार्गावर उत्तर प्रदेश पोलिसांकडून एक हजार लिटर गंगाजल शिंपडलं जाणार असल्याने यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यातच श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, राजस्थान या राज्यातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने गंगाजल आणण्यासाठी हरिद्वार येथे जात असतात. तेथून येत असताना वाटेत गंगाजल सांडणं हे अपवित्र मानलं जातं. त्यामुळं भाविक मार्गस्थ होत असताना मोठी काळजी घेत असतात. त्यामुळं आता यात्रेकरूंच्या भावना लक्षात घेता कावड यात्रा मार्गावर मद्य आणि मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घेण्यात आला आहे. राजस्थान, दिल्ली, हरयाणा आणि उत्तराखंड सरकारने असा निर्णय घेण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिलेले नाहीत.