उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापाने आपल्याच पाच वर्षाच्या मुलांवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. चित्रकूटमधील मऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सखौन्हा गावातील माजरा दुबारी येथे ही घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
राजकुमार ऊर्फ भीमसेन निषाद असे आरोपीचे नाव आहे. पत्नीशी झालेल्या भांडणातून त्याने संतापाच्या भरात घरात खाटेवर झोपलेल्या आपल्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या केली. त्याने कुऱ्हाडीने वार करून चिमुकल्याची हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर त्याने घरालाही आग लावली. मुलाच्या आजोबांनी कसेबसे सून आणि इतर तीन मुलांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. पोलिसांनी आग विझवून आत लपलेल्या हल्लेखोर पित्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार दुबारी येथे राहणारे राजकुमार ऊर्फ भीमसेन निषाद यांचे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पत्नी शिवकुमारी हिच्याशी भांडण झाले. त्यांची चार मुले अनुज, कोमल, कुंती आणि सत्यम तिथेच झोपली होती. या भांडणा दरम्यान सत्यम वगळता तिन्ही मुलांना जाग आली. राजकुमारने पत्नी आणि मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून शेजारी राहणारे राजकुमारचे वडील नथुप्रसाद निषाद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी कसेबसे अनुज, कोमल आणि कुंती या तीन मुलांना व सुनेला घरातून बाहेर काढले. तर पाच वर्षांचा सत्यम आत खाटेवर झोपला होता. ते बाहेर येताच राजकुमारने आत झोपलेला मुलगा सत्यम याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. पाच वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर तसेच शरीरावर अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
राजकुमाराने घराचा मुख्य दरवाजा आतून बंद करून घराला आग लावली होती. हे पाहून राजकुमारच्या वडिलांनी आणि पत्नीने आरडाओरडा केला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच डायल ११२ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने घरातील आग कशीबशी विझवली आणि आत लपलेल्या राजकुमारला पकडले.
राज कुमार यांचे मानसिक संतुलन चांगले नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तो अनेकदा घरात वाद घालतो. घटनेची माहिती मिळताच सीओ मऊ जयकरण सिंह आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनोदकुमार राय यांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर राजकुमार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सत्यमचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या