जर कोणी मुली व महिलांची छेड काढली तर त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यांची वाट यमराज पहात आहे. त्याला यमराजकडे पाठवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आम्हाला सुरक्षेचे कडक उपाय करायला हवेत, असा कडक इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोडरोमियोंना दिला आहे.
उत्तरप्रदेशमधील आंबेडकरनगर एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली होती. ओढणी खेचल्याने सायकलवरून एक विद्यार्थिनी रस्त्यावर पडली होती. त्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीखाली चिरडून तिचा मृत्यू झाला होता. हीरापूर बाजारात १५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. येथे तीन आरोपींनी एका मुलीची छेड काढली. विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरून घरी जात होती. धावत्या सायकलवर बसलेल्या मुलीची ओढणी त्या तिघा आरोपींनी खेचली. त्यामुळे ती रस्त्यावर पडली. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीच्या चाकाखाली आल्याने जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. १७ सप्टेंबरला त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तिघांनी पोलीस कर्मचाऱ्याकडून रायफल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन आरोपींच्या पायात गोळी लागली होती. तर पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा पाय मोडला होता.
या घटनेनंतर मुख्यमंत्री योगींनी रोडरोमिओंना इशारा दिला आहे. गोरखपूरच्या मानसरोवरमधील रामलीला मैदानात ३४३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, कायदा सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आहे. कायदा मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही. रस्त्यावरून जाताना कुणी मुलींची छेड काढल्यास त्यांना यमसदनी पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
संबंधित बातम्या