OYO News: ओयोच्या माध्यमातून हॉटेल रूम बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. कंपनीने आपल्या भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी लॉन्च केली आहे. नव्या धोरणानुसार, अविवाहित जोडप्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये रुम दिली जाणार नाही. सध्या उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. पण येत्या काळात इतर शहरांमध्येही, याची अंमलबजावणी होऊ शकते.
ओयोच्या या नव्या पॉलिसीमध्ये अविवाहित जोडप्यांना वैध पुरावा दाखवावा लागणार आहे. जेणेकरून ते जोडपे असल्याचे सिद्ध होऊ शकतील. ऑनलाइन बुकिंगसाठीही हा नियम लागू असेल. ओयोने एका निवेदनात म्हटले आहे की, ' आमच्या भागिदार असलेल्या हॉटेल्सना सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन कपल बुकिंग रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
ओयोने मेरठमधील आपल्या भागिदार हॉटेल्सना हे नवे धोरण तात्काळ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेरठच्या अनुभवाच्या आधारे कंपनी आगामी शहरांमध्येही हा नियम लागू करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील अनेक सामाजिक संस्थांनी हा मुद्दा कंपनीसमोर मांडला होता. याशिवाय, इतर अनेक शहरांमध्ये अविवाहित जोडप्यांना रुम देऊ नयेत, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळेच कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
ओयोचे उत्तर भारत प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, 'ओयो सुरक्षित आणि जबाबदारीने काम करण्यास वचनबद्ध आहे. एकीकडे आपण व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करतो. त्याचबरोबर सामाजिक संस्थांचा आवाजही आम्ही जबाबदारीने ऐकत आहोत आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहोत. आम्ही वेळोवेळी या धोरणाचे नियम आणि परिणामांचा आढावा घेणार आहोत. ओयोचे म्हणणे आहे की, हे धोरण कंपनीच्या रूढी बदलण्यासाठी आणि कुटुंब, विद्यार्थी, व्यवसाय, धार्मिक आणि एकल प्रवाशांना सुरक्षित अनुभव देण्याबद्दल आहे. या माध्यमातून लोकांना अधिकाधिक रूम बुक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, असे कंपनीने म्हटले आहे.
संबंधित बातम्या