‘युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल’ : ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात खळबळ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल’ : ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात खळबळ

‘युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल’ : ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात खळबळ

Updated Feb 06, 2025 01:12 AM IST

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केला आहे. आम्ही त्या जागेवरील न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करून जागेचे सपाटीकरण करू असा इरादा ट्रम्प यांनी व्यक्त केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (HT_PRINT)

पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत गेले वर्षभर इस्त्रायली लष्कर आणि हमास संघटनेदरम्यान घनघोर युद्ध सुरू असताना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भलतेच वक्तव्य केल्याने अरब देशांत संतापाची लाट उसळली आहे. पॅलेस्टाइनमधील गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी हा भूभाग कायमचा सोडून इजिप्त आणि जॉर्डनमध्ये 'चांगल्या घरांमध्ये' रहायला जायला हवे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल. आम्ही त्याची मालकी घेऊ आणि त्या जागेवरील सर्व धोकादायक न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करणे, जागेचे सपाटीकरण करणे आणि नष्ट झालेल्या इमारती पाडणे, त्या इमारती जमीनदोस्त करणे ही जबाबदारी आपली असेल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अरब देशांत संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात अमेरिका वेस्ट बँकवरील इस्रायलच्या सार्वभौमत्वाबाबत भूमिका घेईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर उभयंताची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर डोनाल्‍ड ट्रम्प यांना भेटणारे नेतन्याहू हे पहिले परदेशी नेते ठरले आहे. 

गाझा पट्टीमध्ये सध्या युद्ध सुरू असताना पॅलेस्टिनी नागरिक गाझा पट्टीत पुन्हा परत येऊ शकतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारलं असता ट्रम्प यांनी वरील उत्तर दिले. ट्रम्प म्हणाले, ‘ जे तेथे परत येऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी आम्ही त्या जागी खरोखरच काहीतरी चांगले करू शकू. जर आपण त्यांच्यासाठी एखाद्या देशात काही बांधू शकतो आणि तो देश जॉर्डन किंवा इजिप्त असू शकतो. आपण तेथे चार-पाच किंवा सहा क्षेत्रे बांधू शकता. जेथे ते सुंदर जीवन जगू शकतील आणि दररोज मृत्यूची भीती राहणार नाही अशा भागात त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असं मला वाटते.’ असं ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर सौदी अरेबियाचा कडाडून विरोध

गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा सौदी अरेबियाला मान्य असेल का, असं विचारलं असता ट्रम्प म्हणाले, ‘यामध्ये सौदी अरेबियाची भूमिका खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यांना मध्यपूर्वेत शांतता हवी आहे... आम्ही ती जागा ताब्यात घेणार आहोत आणि आम्ही तिचा विकास करणार आहोत. तेथे हजारो नोकऱ्या निर्माण करणार आहोत. आणि संपूर्ण मध्यपूर्वेला अभिमान वाटेल अशी ही गोष्ट असेल.’

ट्रम्प यांच्या या पत्रकार परिषदेनंतर सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदन जारी केले आहे. पॅलेस्टिनी राष्ट्राच्या बाजूने सौदी अरेबियाची भूमिका ही ‘ठाम आणि अढळ’ आहे. त्याशिवाय ते इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणार नाहीत. इस्रायलने पॅलेस्टिनी क्षेत्रात बांधलेल्या वसाहती, पॅलेस्टिनी जमीन ताब्यात घेणे आणि पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या भूमीतून विस्थापित करण्याचे प्रयत्न आदि विषयांबाबत सौदी अरेबियाने आपली भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली आहे, असं या निवेदनात म्हटले आहे.

 

 

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर