पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ जगभरातून सूर उमटत असताना आता खुद्द अमेरिकी लष्करामध्ये या युद्धाविरोधी असलेली खदखद बाहेर प्रकट होऊ लागली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर अमेरिकी वायुसेनेत कार्यरत सैनिकाने स्वत:ला पेटवून घेण्याची घटना घडली आहे. पेटवून घेण्यापूर्वी या सैनिकाने Free Palenstine अशी घोषणा दिली होती.
फ्री पॅलेस्टाईन'च्या घोषणा देत आरोन बुशनेल नावाच्या या २५ वर्षाच्या वायुदलाच्या सैनिकाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील द्रव शिंपडले. यापुढे मी नरसंहारात सहभागी होणार नाही, अशी घोषणा दिली आणि पेटवू घेतले, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायवर केलेल्या हल्ल्यात १२०० इस्रायली ठार झाले होते. या हल्ल्यानंतर हमासने २५३ इस्त्रायलींना ओलिस म्हणून पकडून घेऊन गेले होते. त्यानंतर इस्त्रायलच्या लष्कराने पॅलेस्टाइनवर जोरदार हल्ले सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही ताजी घटना घडली आहे.
इस्रायली सैन्याद्वारे गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ३० हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये अमेरिकेच्या अटलांटा शहरात इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर युद्धाचा निषेध करणाऱ्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले होते.