मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हाताने मैला उचलण्याची पद्धत होणार बंद; ऐतिहासिक निर्णय घेताना अर्थमंत्र्यांनी सूचवला नवा पर्याय

हाताने मैला उचलण्याची पद्धत होणार बंद; ऐतिहासिक निर्णय घेताना अर्थमंत्र्यांनी सूचवला नवा पर्याय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 01, 2023 12:59 PM IST

Union Budget 2023 : मैला साफ करणाऱ्या अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यामुळं सुप्रीम कोर्टानं अनेकदा केंद्राला फटकारलं होतं. त्यानंतर आता याबाबत बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Union Budget 2023 Loksabha
Union Budget 2023 Loksabha (HT)

Union Budget 2023 Loksabha : ग्रामपंचायत, नगरपरिषदा आणि महापालिकांत काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शहरांतील मैला आता हातानं साफ करण्याची पद्धत बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता देशभरातील अनेक शहरांमध्ये भूमिगत गटारातून मैला साफ करणाऱ्या लाखो सफाई कामगारांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यानंतर आता मैला साफ करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

बजेट सादर करताना कामगारांच्या प्रश्नावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, सफाई कामगारांना आता हातानं मैला साफ करण्याची पद्धत आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मैला साफ करण्यासाठी आम्ही नवी योजना लागू करत आहोत. मैला साफ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचं सीतारमन म्हणाल्या. याशिवाय देशातील महानरांमध्ये सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही अर्थमंत्र्यांनी नमूद केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध शहरांमध्ये हातानं मैला साफ करणाऱ्या कामगारांचा भूमिगत गटारात गुदमरून मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टानं केंद्रातील मोदी सरकारला ही प्रथा बंद करण्याच्या सूचना करत चांगलंच फैलावर घेतलं होतं. याशिवाय मैला साफ करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत सरकारला यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. अनेकदा मैला साफ करण्यासाठी गटारात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळं कामगारांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हातानं मैला साफ करण्याची प्रथा बंद करण्याची घोषणा केली आहे.

IPL_Entry_Point