What Is Budget 2024: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाचे स्वरूप जरी अंतरिम असले तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अर्थसंकल्पाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
अर्थसंकल्पाद्वारे सरकार आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन सांगते. याशिवाय, या अर्थसंकल्पातून सरकार नागरिकांसाठी कोणत्या योजना जाहीर करणार आहे. तसेच कोणती वस्तू महागणार आहे आणि कोणत्या वस्तूंसाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतील, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. सर्वसामान्यांना या गोष्टी पटकन समजत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आर्थिक शब्दांचा अर्थ सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला बजेट सहज समजून घेण्यास मदत होणार आहे.
अर्थसंकल्प हा संतुलित अर्थसंकल्प, अतिरिक्त अर्थसंकल्प आणि तूट बजेट अशा तीन श्रेणीत विभागला जातो. संतुलित अर्थसंकल्पात अर्थसंकल्प महसूल खर्चाच्या बरोबरीचा असतो. अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित महसूल अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असतो आणि तूट अर्थसंकल्पात अंदाजे खर्च अंदाजित महसुलापेक्षा जास्त असतो.
दरम्यान, १९९९ पासून केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली. यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर केले जात होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदाच ०१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला होता.तेव्हापासून अर्थसंकल्प दरवर्षी ०१ फेब्रुवारीला सादर केला जाऊ लागला.