Union Budget 2024 : १ कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’; आता ३ कोटींचे लक्ष्य, काय आहे योजना?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget 2024 : १ कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’; आता ३ कोटींचे लक्ष्य, काय आहे योजना?

Union Budget 2024 : १ कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’; आता ३ कोटींचे लक्ष्य, काय आहे योजना?

Feb 01, 2024 01:46 PM IST

Lakhpati Didi Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, देशात १ कोटी महिला लखपती झाल्या आहेत. आता लक्ष्य ३ कोटी करण्यात आले आहे.

Union Budget 2024
Union Budget 2024

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.  या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणताही दिलासा न देता वंदे भारत ट्रेन, मध्यम वर्गीयांच्या घरकुलासाठी मोठी तरतूद केली आहे. त्याचबरोबर देशात १ कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता ३ कोटींचं लक्ष्य असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद वाढवली. 

अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की, लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. देशभरात लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटी असताना १ कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. आता याचे लक्ष्य दोन कोटीवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे ९ कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. 

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सरकारने मागील १० वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट, २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. देशातील दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे लक्ष्य वाढवत ३ कोटी केलं आहे.

काय आहे लखपती दीदी योजना?

लखपती दीदी योजनेचा उद्देश गरिबी निर्मूलन आणि आर्थिक सशक्तीकरण आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान केलं जाईल. जेणेकरुन त्या प्रतिवर्ष १ लाख रुपयांपेक्षा अधिक कमावू शकतील. ही योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात राबवण्यात येणार आहे. लखपती दीदी बनवण्यासाठी महिलांना अनेक प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल. यामध्ये महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन उपलब्ध करुन देऊन त्यांना ड्रोनचं संचालन आणि दुरुस्ती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर