Sanjay Raut on Union Budget : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प काल संसदेत मांडला गेला. या अर्थसंकल्पावर आता राजकीय, सामाजिक व आर्थिक वर्तुळात विश्लेषण सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.
‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडताना सातत्यानं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा उल्लेख करत होत्या. त्यावरून राऊत यांनी खोचक टीका केली आहे. 'अमृतकाळ हा केवळ भाजपच्या निवडणुकांसाठी आहे. केंद्राचं बजेट हे पूर्णपणे निवडणुकीचं बजेट आहे. जनतेच्या पैशानं सार्वत्रिक निवडणुका कशा लढवायच्या याच उत्तम उदाहरण म्हणजे हे बजेट आहे, अशी टीका त्यांनी केली.
'बजेटवर टीका करण्याचा मुद्दा नाही, पण ज्या मुंबई व महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो, त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? बजेटच्या आधी साउथ ब्लॉकमध्ये एक हलवा बनवण्याचा कार्यक्रम असतो. त्यातला चमचाभर हलवाही मुंबई किंवा महाराष्ट्राला मिळाला नाही, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
'गेल्या काही वर्षांपासून मुंबई व महाराष्ट्राचं औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या नुकसान करण्याचं कारस्थान सुरू आहे. कालच्या बजेटमध्ये त्याचंच प्रतिबिंब दिसलं. पंतप्रधान मोदी अलीकडं वारंवार मुंबईत येतायत. पण येताना काय आणतायत. केंद्रीय मंत्र्यांच्या टोळधाडी येतायत. उपमुख्यमंत्री मोठमोठ्या घोषणा करतायत. पण मुंबईला काय मिळतंय हा एक रहस्यमय विषय आहे. ह्या सर्व घोषणा फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून होतायत. शिवसेनेची सत्ता घालवून, मुंबई महापालिका जिंकून, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा जर कोणाला समाधान मिळवायचं असेल तर ते त्यांना शक्य नाही, असंही संजय राऊत यांनी ठणकावलं.
‘बजेटकडून मुंबईकरांना अनेक अपेक्षा होत्या. अनेक खासदारांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यावर आम्ही आवाज उठवत राहू,’ असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
संबंधित बातम्या