ED officer Suicide : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयच्या चौकशीत असलेल्या ईडी अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीचे अधिकारी आलोक कुमार पंकज यांचा मृतदेह मंगळवारी दिल्लीजवळ साहिबााबादमध्ये रेल्वे रुळावर आढळला.
मूळचे गाझियाबादचे रहिवासी असलेले आलोक कुमार नवी दिल्लीत ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. याआधी त्यांनी आयकर विभागात काम केले होते. अलीकडे, कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली, परंतु पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली होती.
ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांना सीबीआयने अटक केली, तेव्हा आलोक कुमार पंकज यांचे नाव लाच प्रकरणात समोर आले होते. सीबीआयला एका व्यक्तीकडून या बाबत तक्रार मिळाली होती की संदीप सिंगने आपल्या मुलाला अटक न करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर एजन्सीने सापळा रचला आणि सिंग ही दिल्लीत २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले.
संदीप सिंगने मुंबईतील एका ज्वेलर्सकडून लाच घेतल्याचा आरोपही केला होता, ज्यांच्या दुकानावर यापूर्वी ईडीने छापा टाकला होता. याच प्रकरणात संदीप सिंहसोबत आलोक कुमार पंकज यांनाही सहआरोपी करण्यात आले होते. या प्रकरणानंतर संदीप सिंग यांना निलंबित करण्यात आलं होतं. पोलिसांनी ईडी अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवला असून त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
आलोक कुमार यांचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र, या प्रकरणी घातपात झाल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीनेही तपास करण्यास सुरुवात केली आहे.