ukrainian strike at russia belgoraod : रशियाच्या बेलग्रेड शहरावर युक्रेनने केलेल्या प्राणघातक क्षेपणास्त्र हल्ल्यात १४ रशियन नगरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात १०८ जण जखमीही झाले आहेत. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने शनिवारी याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात १२ नागरीक तर दोन मुले ठार झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. जखमींमध्ये १५ मुलांचाही समावेश आहे. यापूर्वी, मंत्रालयाने नऊ पुरुष आणि एका मुलासह १० मृत्यूची नोंद केली होती. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. एजन्सी एएफपीच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्र हल्यात झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अनेक वाहने जळालेल्या अवस्थेत दिसून येत असून याचा धूर शहराच्या मध्यभागी पसरला आहे.
दरम्यान, या हल्ल्यामुळे रशियाचा तीलपापड झाला आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर युक्रेनने केलेल्या हा प्रतिहल्ला आहे. दरम्यान, या कृत्यामुळे युक्रेनला मोठी शिक्षा भोगावी लागेल असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. याशिवाय रशियाने बेलग्रेड हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यासही सांगितले.
प्रांतीय गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली. त्यानुसार क्षेपणास्त्राने एका निवासी इमारतीला लक्ष्य केले. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. या हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात सायरन वाजवण्यात आले. युक्रेनच्या सीमेपासून बेलग्रेड फक्त ३० किलोमीटर अंतरावर आहे. वर्षभर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमुळे हे शहर असुरक्षित राहिले आहे.