Ukraine Russia war : रशिया युक्रेन युद्ध गेल्या दोन वर्षापासून सुरू असून थांबण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले केले जात असताना आता रशियामध्ये अमेरिकेतील ९-११ प्रमाणे हल्ला झाला आहे. रशियातील कझान शहरातील किमान ६ निवासी इमारतींवर ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे ड्रोन इतर अनेक इमारतींना लक्ष्य करणार होते, पण रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते हाणून पाडले. कझान शहरातील या ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून यातून हल्ल्याची भीषणता दिसते. या हल्ल्याने रशियामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
समोर आलेल्या छायाचित्रांनुसार, ड्रोन इमारतींना धडकले आणि त्यानंतर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा हल्ला ९/११ सारखा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमेरिकेतील ९/११ चा हल्ला खूप मोठा होता त्यावेळी मोठी विमाने इमारतींवर आदळली होती. त्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. रशियात झालेल्या या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान रशियन प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला युक्रेनने केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. रशियातील कझान शहराची गणना सुरक्षित आणि शांत शहरांमध्ये केली जाते. कझानकडे जाणारी हवाई वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे १४ लाख आहे. यापूर्वी एका रशियन जनरलची ही हत्या केली होती. त्यामुळे युक्रेनवरील संशय वाढला आहे. रशिया जगातील महासत्तांपैकी एक आहे. अशा वेळी रशियानेही प्रत्युत्तर दिल्यास युद्धाची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
यापूर्वी रशियातील रिल्स्क येथे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका मुलासह सहा जण ठार झाले होते. रशियाच्या कुर्स्क प्रांताचे कार्यवाहक गव्हर्नर अलेक्झांडर खिनस्टीन यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. खिश्तीन यांनी सांगितले की, युक्रेनच्या सशस्त्र दलाने रिल्स्क शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर रशियाच्या तपास यंत्रणेने युक्रेनने रिल्स्क शहरावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी दहशतवादी हल्ल्याच्या आरोपाखाली फौजदारी खटला सुरू केल्याचे सांगितले.
खिश्तेन यांनी टेलिग्रामवर सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. १३ वर्षीय मुलासह दहा जण जखमी झाले असून त्यांना रिल्स्क येथील मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्याच्या जखमा किरकोळ असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यपाल म्हणाले की, आपत्कालीन सेवा घटनास्थळी काम करत आहेत आणि तज्ञ नुकसानीचा अंदाज घेत आहेत आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.
संबंधित बातम्या