Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास ३ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावरील निर्बंध वाढवण्याची मागणी केली आहे. या सोबतच युक्रेनने रशियावर आता काउंटर अटॅक करण्यास सुरवात केली आहे. शनिवारी व रविवारी युक्रेनने रशियाच्या भूभागावर ड्रोन आणि अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशिया संतापला आहे. युक्रेनच्या लष्कराने रविवारी रशियाच्या पश्चिम कुर्स्क भागात मोठा हवाई हल्ला केला. ६ ऑगस्ट पासून युक्रेनच्या सैनिकांनी या भागात आपले वर्चस्व मिळवलं आहे. गेल्या पाच महिन्यांपासून रशियन सैन्य युक्रेनला आपल्या हद्दीतून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहे. या साठी रशियाने उत्तर कोरियाचे सैनिकांची देखील मदत घेतली आहे.
रशियाने शनिवारी युक्रेनवर १०३ ड्रोनने हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. गेल्या एका आठवड्यात रशियाने ६०० हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत, असेही ते म्हणाले. एवढेच नाही तर झेलेन्स्की म्हणाले की, ड्रोनशिवाय रशियाने अनेक गाईडेड एरियल बॉम्ब आणि क्षेपणास्त्रेही डागली आहेत. झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही दररोज रशियन हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करत आहोत. तर रशियाचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत.
युक्रेन केलेला प्रतीहल्ला किती मोठा आहे आणि यामुळे रशियाचे किती नुकसान झाले आहे? याची माहिती रशियाच्या प्रसारमाध्यमांनी अद्याप उघडपणे दिलेली नाही. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, युक्रेनने रशियावर केलेले दोन मोठे हल्ले हाणून पाडले असल्याचे रशियन माध्यमांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सैनिकांनी रविवारी युक्रेनचे दोन प्रतिहल्ले हाणून पाडले.
युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या पश्चिम कुर्स्क भागात नवी आघाडी उघडली आहे. या बाबतची माहिती रशियन लष्करी ब्लॉगर्सनी रविवारी दिली. रशियन ब्लॉगर्स युक्रेन रशिया युद्धाचे समर्थन करत असून या युद्धात रशियाला आलेल्या अपयशाची देखील ते माहिती देत असतात. युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियन सैन्य बॅकफूटवर गेले आहेत. रशियन सैन्याचा आक्रमक पवित्रा देखील कमी झाला आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
युक्रेनच्या मोठ्या हल्यानंतर देखील रशियन सैन्याच्या लष्करी तुकड्या धाडसाने लढत असल्याची माहिती रशियन प्रसारमाध्यमे स्वोडकीने दिली आहे. या युद्धात तोफखाना आणि लहान शस्त्रास्त्रांद्वारे हल्ले केले जात आहे. युक्रेन मोठ्या संख्येने पायदळ आणण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या बख्तरबंद वाहनांचा वापर करत आहे.
युक्रेनने शनिवारी व रविवारी रशियावर अमेरिकेकडून घेतलेली एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे डागली होती. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, युक्रेनकडून अशी आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, परंतु ही क्षेपणास्त्र रशियन हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच नष्ट केली. रशियाने या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी युक्रेनला दिली आहे. रशियाच्या इशाऱ्यानंतरही युक्रेनचे रशियावरील हल्ले हे सुरूच आहेत. थांबलेले नाहीत.
संबंधित बातम्या