UGC NET 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीएने यूजीसी-नेट २०२४ च्या फेरपरीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. यूजीसीने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, यूजीसी नेट २०२४ येत्या २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान होणार आहे.
एनटीएने नोटिशीत म्हटले आहे की, "नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) २१ ऑगस्ट २०२४ ते ०४ सप्टेंबर २०२४ दरम्यान सीबीटीमध्ये ८३ विषयांमध्ये 'कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती', (२) 'सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश' आणि (३) केवळ पीएचडीसाठी प्रवेश' घेण्यासाठी यूजीसी - नेट जून २०२४ आयोजित केली जाईल.
एनटीएने असेही सूचित केले आहे की सिटी ऑफ एक्झाम सेंटरची माहिती देण्यासंदर्भातील अधिसूचना परीक्षेच्या १० दिवसांच्या आधी ugcnet.nta.ac.in आणि nta.ac.in एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.
ताज्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येकी तीन तासांचा कालावधी असणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
एनटीएने १८ जून रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून ९.०८ लाख उमेदवारांसाठी यूजीसी नेट जून परीक्षा यशस्वीरित्या आयोजित केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिक्षण मंत्रालयाने परीक्षेच्या प्रामाणिकतेशी तडजोड झाली असल्याचे म्हणत परीक्षा रद्द केली होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याची माहिती दिली. एनटीए मागील वेळेपर्यंत सहाय्यक प्राध्यापकपद, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि पीएचडी प्रवेशासाठी यूजीसी नेट परीक्षा सीबीटी पद्धतीने घेत होती. मात्र, जूनची परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने आणि एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे एजन्सीने जाहीर केले होते.
१८ जून रोजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिले सत्र सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू होते.
यूजीसी नेट 2024 साठी प्रवेशपत्रांबद्दल प्रश्न आणि ताज्या अपडेट्स आणि इतर माहितीसाठी उमेदवारांना एनटीएच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.