Jammu and Kashmir Terror attack : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्याच्या वरच्या भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले. जम्मू काश्मीरच्या छत्रू भागातील नैदघम भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार घेराबंदी व शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार जवान गंभीर जखमी झाले होते. यातील दोन जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. तर दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे.
छत्रू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नैदघम गावाच्या वरच्या भागात पिंगनाल दुगड्डा जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. यावेळी जंगलात लपून लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत लष्कराचे चार जवान जखमी झाले. तर असून त्यापैकी दोन जेसीओ नायब सुभेदार विपन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करानेही दोन जवानांच्या हौतात्म्याला दुजोरा दिला आहे. नायब सुभेदार विपिन कुमार आणि भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सचे कॉन्स्टेबल अरविंद सिंग हे शहीद झाले.
व्हाइट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग आणि शाहिद झालेल्या शूर जवानांच्या बलिदानाला सलाम करतात तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतात, असं लष्कराने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता ही चकमक सुरू झाली. सैनिक व दहशतवादी समोरसमोर आल्याने दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. यात जखमी सैनिकांवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारकेल्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्याच्या १८ तारखेला विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा वेळी दहशतवादी निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. यासोबतच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यातील १६ जागांवरही मतदान होणार आहे.
यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते की, शुक्रवारी किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली होती. ही चकमक पिंगनल दुगड्डा वनपरिक्षेत्रात सुरू आहे, जी चत्रु पोलिस स्टेशनच्या हद्दीत नायदागाम गावाच्या वरच्या भागात आहे.
चकमकीपूर्वी, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट शहरात पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवादी लपण्याचे ठिकाण सापडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, १२ सीआरपीएफने चमराड सुरनकोटच्या सामान्य भागात संयुक्त शोध मोहीम राबवली.
परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहीम सुरू असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले. यानंतर अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला व संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. शोध मोहीम दरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले आणि काही शस्त्रे, दारूगोळा आणि खाद्यपदार्थ जप्त केले.
संबंधित बातम्या