स्वत:शीच लग्न करून व्हायरल झालेली तुर्की टिकटॉक स्टार कुब्रा अयकुत हिचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. इस्तंबूलमधील सुलतानबेली येथील एका आलिशान अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून अयकुत हिचा सोमवारी मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, ज्यामुळे तिने आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नााही.
'वेडिंग विदाऊट अ ग्रूम' या व्हायरल व्हिडिओमुळे प्रसिद्ध झालेल्या अयकुतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त करत सांगितले की, मृत्यूपूर्वी अयकुत सतत नैराश्येत असल्यासारखी पोस्ट करत होती. नुकतीच तिने आपल्या वजनाबाबत एक पोस्ट केली होती. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये अयकुतने लिहिले की, मी माझी सर्व शक्ती पणाला लावली आहे पण तरीही माझे वजन वाढत नाही. माझे दररोज एक किलोने वजन कमी होत आहे, मी काय करावे हे मला समजत नाही.
आपल्या व्हायरल व्हिडिओमध्ये अयकुतने परंपरेला छेद देत टिकटॉकवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, 'मला स्वत:साठी योग्य वर सापडत नाहीये. त्यानंतर अयकुतने पुष्पगुच्छ घेऊन स्वतःवर प्रेम करण्याचे वचन देऊन ओरडताना आणि आपल्या कारमधून निघताना दिसत आहे. त्यानंतर तिने त्याच दिवशी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तिने बर्गर खाताना स्वतःला नर्व्हस वधू म्हणून वर्णन केले.
तिच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर शोककळा पसरली असून त्यांच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. तिच्या अनेक समर्थकांनी अयकुतला सुंदर अंतःकरणाची महिला म्हटले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
दरम्यान, तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी अयकुतच्या मृत्यूच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. अयकुतच्या घरी त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रार्थनेचे आयोजन केले होते, ज्यात तुर्कस्तानमधील अनेक टिकटॉक इन्फ्लुएंसर सहभागी झाले होते.