No Smoking: धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यागाची गरज असते. जगभरातील बरेच लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्वचितच यशस्वी होतात. अशीच एक रंजक कहाणी आहे तुर्कस्तानच्या इब्राहिम युसेलची. २०१३ मध्ये इब्राहिम युसेलने धूम्रपान सोडण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला. त्याने डोक्यावर हेल्मेटसारखा धातूचा जाळीचा पिंजरा घातला होता, ज्यामुळे त्याला सिगारेट ओढता येत नव्हती. या पिंजऱ्याची चावी फक्त त्याच्या पत्नीकडे होती. जेवणाच्या वेळी त्याची पत्नी हा पिंजरा उघडायची.
इब्राहिम गेल्या २६ वर्षांपासून दररोज दोन पॅकेट सिगारेट ओढत होता. धुम्रपान सोडण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. दरवर्षी आपल्या तीन मुलांच्या वाढदिवशी आणि लग्नाच्या वाढदिवसाला त्याने आपल्या कुटुंबाला धूम्रपान सोडण्याचे वचन दिले होते, परंतु काही दिवसांनी त्याने पुन्हा धूम्रपान सुरू केले.
इब्राहिमचे हे पाऊल तुर्कस्तानसह जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात त्याची पत्नी त्याच्या डोक्यावर पिंजरा लावताना दिसत होती. मात्र, त्याने धूम्रपान पूर्णपणे सोडले आहे की नाही? हे स्पष्ट झालेले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात धूम्रपानामुळे दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी बहुतेक मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात, जिथे तंबाखू कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि त्यांचा प्रचार करतात. याव्यतिरिक्त, धूम्रपान करणार्यांसह राहणारे लोक देखील असुरक्षित आहेत. इतरांच्या धुरामुळे दरवर्षी १२ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अर्ध्याहून अधिक मुले प्रदूषित धुराचा श्वास घेतात, ज्यामुळे दरवर्षी ६५,००० मुलांचा मृत्यू होतो.
संबंधित बातम्या