Turkey- syria Earthquake: तुर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे आतापर्यंत १५ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येत नागरिक जखमी झाले आहेत. अद्यापही कित्येक लोक ढिगाऱ्याखाळी अडकल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भूकंपग्रस्त तुर्कीत १० भारतीय नागरिक अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी घेतलेल्या पत्रका परिषदेत घेतली. त्यावेळी भूकंपग्रस्त तुर्कीत १० भारतीय नागरिक अडकल्याचे माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांनी दिली. हे नागरिक सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्याचे काम सुरू आहे. पण एक भारतीय नागरिक दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीयांसाठी अंकारा येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आल्याचे समजत आहे.
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट देत आहेत. एकट्या तुर्कस्तानमधील मृतांची संख्या साडे आठ हजारांच्या पुढे गेली आहे. पहिल्या दिवशी बचावकार्य तोकडे पडल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु, त्यानंतर आता मदत कार्याने वेग घेतला आहे, याबाबत स्थिती सुधारल्याचे रेसेप तय्यप एर्दोगान यांनी सांगितले.
सिरियासारख्या भागात अनेक संकटांवरचे हे विनाशकारी संकट असल्याचे सांगून जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली.
संबंधित बातम्या