इस्त्रायल आणि हमासदरम्यानचा रक्तरंजित संघर्षाला विराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून युद्धविराम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हमासच्या ताब्यात ओलिस असलेल्या इस्त्रायली नागरिकांची सुटका करण्याच्या अटीवर हे युद्धविराम होणार आहे. याबाबत झालेल्या प्राथमिक चर्चेतून एक मसुदा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार दोन्ही बाजुंनी ४० दिवस सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबविणे आणि इस्रायली आणि पॅलेस्टिनी ओलिसांची देवाण-घेवाण करण्याचा करार असल्याची माहिती या चर्चेशी संबंधित एका वरिष्ठ सूत्राने मंगळवारी 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला दिली.
प्रस्तावित युद्धबंदी अंतर्गत गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे उद्धवस्त झालेली रुग्णालये आणि बेकऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. युद्धबंदीदरम्यान दररोज ५०० ट्रक मदत घेऊन गाझा पट्ट्यात प्रवेश करणार आहेत. शिवाय गाझामधील विस्थापितांना राहण्यासाठी हजारो तंबू वितरित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या युद्धबंदी काळादरम्यान हमासकडून एकूण ४० इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. या ओलिसांमध्ये प्रामुख्याने महिला, १९ वर्षांखालील मुले, ५० वर्षांवरील वृद्ध आणि आजारी ओलिसांचा समावेश असेल. तर इस्रायलकडून सुमारे ४०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. इस्त्रायल या सोडण्यात आलेल्या ओलिसांना पुन्हा अटक करणार नाही, असं आश्वासन देण्यात आलं आहे.
पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत सुरू असलेलं घनघोर युद्ध थांबवण्यासाठी तसेच हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली आणि काही परदेशी ओलिसांची सुटका करण्यासाठी गेल्या आठवडाभरात विविध आंतरराष्ट्रीय संघटनांकडून प्रयत्न केले जात होते.
गाझा पट्टीतील दक्षिण टोकावर वसलेल्या रफाह शहरावर इस्रायली लष्कर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता. या शहरात सध्या १० लाख विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला आहे. इस्त्रायलचा हा हल्ला रोखण्याच्या आशेने मध्यस्थ देशांनी शस्त्रसंधीसाठीचे प्रयत्न सुरू केले आहे.
दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीत रमजानच्या महिन्यादरम्यान लष्करी कारवाया न करण्याविषयी सहमती दर्शविली असून ही शस्त्रसंधी १० मार्च २०२४ ते ९ एप्रिल २०२४ दरम्यान असेल अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली. एनबीसी'च्या 'लेट नाईट विथ सेथ मेयर्स' या कार्यक्रमात बायडेन यांनी ही माहिती दिली.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्लात १२०० इस्त्रायली नागरिक मारले गेले होते. तर २५३ इस्त्रायलींना ओलिस म्हणून ताब्यात ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझावर जमिनीवरून हल्ला सुरू केला होता. इस्रायलच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ३० हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या