आयफोन सारखा महागडा फोन हरवल्यानंतर टेन्शन येणं साहजिकच आहे. त्यातही फोनमध्ये अनेक दिवसांच्या परिश्रमाने साठवलेला डेटा हा तर फोन इन्स्ट्रुमेंटपेक्षा कितीतरी मौल्यवान असतो. तथापि, हरवलेले डिव्हाइस परत कसे मिळवावे आणि त्यातली माहिती सुरक्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना असू शकतात, यावर या लेखात माहिती घेणार आहोत.
तुमच्या मोबाइलमध्ये 'Find My' अॅप सेट केलेले असेल तर तुमच्या हरवलेल्या आयफोनचा मागोवा घेण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी दुसऱ्या एखाद्या फोन डिव्हाइसवरून 'Find My' हे अॅप उघडा, आपल्या अॅपल आयडीसह साइन इन करा आणि हरवलेला आयफोन निवडा. एक नकाशा त्याचे स्थान दर्शवेल. त्यानंतर ब्राउझरमधून iCloud.com जा, लॉगिन करा आणि आपले डिव्हाइस शोधण्यासाठी 'फाइंड माय आयफोन' वर क्लिक करा. तुम्ही फोनजवळ असाल आणि तुमचा सायलेंट मोडवर जरी असला तरी अॅपच्या माध्यमातून आवाज प्ले करू शकता.
तुमचा फोन बाहेर कुठे हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर Lost Mode ची मदत होऊ शकते. त्यासाठी 'Find My' अॅप ओपन करा किंवा iCloud.com साइन इन करा. त्यात तुमचा फोन निवडा आणि 'मार्क एज लॉस्ट' किंवा 'लॉस्ट मोड' निवडा. ज्या कुणा व्यक्तिला तुमचा हरवलेला फोन सापडेल त्याच्यासाठी तुम्ही संपर्काचा तपशील किंवा सूचना लिहू शकता. Lost Mode सक्रिय केल्यास तुमचे मोबाइल लॉक होते. शिवाय अतिरिक्त सुरक्षिततेसाठी अॅपल पे डिसेबल करते.
कोणतेही मोबाइल यंत्र हे त्यात साठवलेल्या यूजरच्या वैयक्तिक डेटामुळे अधिक महत्वाचे असते. तुमच्या फोनमधील डेटा कुणाच्या हाती पडू नये यासाठी तुम्ही तो रिमोट पद्धतीने डिलीट करू शकता. हरवलेल्या मोबाइल फोनमधील डेटा रिमोटली डिलीट करण्यासाठी 'Find My' अॅप किंवा iCloud.com चा वापर करा. मात्र हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की यामुळे फोनचे ट्रॅकिंग थांबू शकते. शिवाय अशावेळी डेटाची पुनर्प्राप्ती करणे शक्य होत नाही. मोबाइलमध्ये तुमच्या अकौंटमध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी appleid.apple.com वर जाऊन आपला अॅपल आयडी पासवर्ड बदला.
आपला आयफोन हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे हे आपल्या टेलिकॉम कंपनीला त्वरित कळवून सिमकार्ड अक्षम करण्याचे त्यांना सांगावे. यामुळे तुमच्या सिमकार्डचा अनधिकृत वापर टळेल. टेलिकॉम कंपन्या चोरीला गेलेल्या डिव्हाइसला काळ्या यादीत टाकण्यास मदत करू शकतात. यामुळे चोरांना त्यांनी चोरलेले फोन बाजारात विक्री करणे कठीण होते.
फोन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा. पोलीस तक्रार दाखल करताना तुमच्या डिव्हाइसच्या आयएमईआय क्रमांकाची आवश्यकता असते. हा क्रमांक आयक्लाउडवर तुमच्या डिव्हाइस तपशीलाखाली आढळेल. मोबाइल चोरीची तक्रार पोलीसांमध्ये केल्यास मोबाइल परत मिळवण्यामध्ये त्याचा फार उपयोग होत नसला तरी विम्याचा दावा करताना त्याची मदत होऊ शकते.
संबंधित बातम्या