sanjay raut on praful patel property : मनी लाँड्रिंग केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रॉपर्टीवर ईडीनं केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. त्यांची प्रॉपर्टी पुन्हा एकदा खुली केली आहे. ईडीच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ही संधी साधत ईडी आणि मोदी-शहांवर हल्ला चढवला आहे. प्रफुल्ल पटेल आता मंत्री होणार असल्यानं मोदी-शहांनी इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल पटेलांना परत केली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. ईडीनं घेतलेल्या निर्णयावर काय बोलणार? सगळ्यांना सगळं माहीत आहे. माझीही प्रॉपर्टी जप्त केली गेली आहे. राहतं घर सील केलंय. हे घर कोणत्याही गँगस्टरशी संबंधित नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित नाही. पण मी भाजपसोबत गेलो नाही, पक्षांतर केलं नाही त्यामुळं खोटं प्रकरण रचून माझी संपत्ती जप्त केली. ही प्रॉपर्टी सोडवून घ्यायची असेल तर मला भाजपसोबत जावं लागेल. मोदी मोदी करावं लागेल. जे मी कधी करणार नाही, असं राऊत म्हणाले.
‘हा ईडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ईडी, सीबीआय ही भाजपची विस्तारित शाखा आहे असं मी म्हणतो त्याला कारणं आहेत. आता प्रफुल पटेल यांना मंत्री बनायचं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल्ल पटेल यांना परत दिली, असं ते म्हणाले. ’ईडीनं घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. हाच नियम, हाच कायदा इतरांनाही लावला गेला पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय्य पद्धतीनं जप्तीची कारवाई केली आहे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. फक्त प्रफुल्ल पटेल यांनाचा का? पटेल यांच्याशी आमचं व्यक्तिगत शत्रुत्व नाही. पण न्याय सर्वांना समान हवा. कायदा एकच आहे ना. ईडी सगळ्यांसाठी आहे ना. हा ईडीच्या प्रतिष्ठेचा, विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.
'आम्ही कायदेशीर लढाई लढणार. आमच्याकडं प्रॉपर्टी नाही. ज्या घरात आम्ही राहत होतो ते घर आणि गावातील १० गुंठे जमीन जप्त केली. हे मनी लाँड्रिंगचे पैसे नव्हते. उलट प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप होते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे गेले त्यांच्यावरही हेच आरोप होते. पण सर्वांच्या मालमत्ता खुल्या झाल्या. जे राजकीय विरोधक आहेत, त्यांची प्रॉपर्टी अजून जप्त आहे. पण आम्ही घाबरत नाही. आमच्या अंगावरचे कपडे जप्त केले तरी आम्ही पक्षाशी, महाराष्ट्राशी आणि देशाशी बेईमानी करणार नाही, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.