Aadhaar card: आपल्या आसपास कधी अशा गोष्टी घडतात, ज्याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. अशाच एका गोष्टीमुळे बिहारमधील एक गाव सध्या चर्चेत आहे. या गावात आधारकार्ड पाहूनच अनोळखी व्यक्तीला प्रवेश दिला जातो. या गावातील लोक हातात काठ्या घेऊन गस्त घालतात. मात्र, यामागचे कारण काय? हे जाणून घेऊयात.
हे प्रकरण नालंदा जिल्ह्यातील आहे. रोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरा गावात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे घाबरलेल्या ग्रामस्थांनी आता सुरक्षेची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. या गावातील लोक रोज रात्री गस्त घालतात. रात्री उशीरा गावात अनोळखी व्यक्ती दिसल्यास सर्वात प्रथम त्याचे आधारकार्ड तपासले जाते. त्यानंतरच त्याला गावात प्रवेश दिला जातो. स्थानिक लोकांनी सांगितले की, गावातील एका व्यक्तीच्या घरात ३ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपल्या गावाच्या रक्षणासाठी एक पथक तयार केले. या पथकात कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश असेल.
रात्री गस्त घालण्यासाठी एकूण सात पथक तयार करण्यात आली. दररोज रात्री हे पथक गल्ली, परिसर, चौक, गोठ्यात गस्त घालतात. अनोळखी आणि बाहेरील व्यक्तींची ओळख पटल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश दिला जातो.चोरीच्या घटनेला वैतागून त्यांना असे पाऊल उचलावे लागले, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मारुई पंचायतीतील मानपूर, जागीर आणि राजा विगहा येथील ग्रामस्थही रात्रभर गस्त घालतात. रविवारी ग्रामस्थांना काही संशयित लोक फिरताना दिसले.
रोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरा गावातील एका घरातून ३ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ६ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी रातोई गावातील तीन आणि परतापूर येथील एका घरातून दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. आठवडाभरात चोरीच्या तीन घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, वरील घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थ रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत.