Trending News : निरोगी आयुष्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किमान ६ ते ८ तासांची झोप खूप महत्त्वाची असते. कमीत कमी ६ तास झोप न घेतल्याने शरीराला थकवा तर येतोच शिवाय चिडचिड आणि आजारही जडतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण, जपानमधील एक व्यक्ती गेल्या १२ वर्षांपासून दिवसातून फक्त ३० मिनिटेच झोपत आहे. त्यानं दावा केला की, इतक्या कमी झोपेनं त्याचं आयुष्य जास्त आणि जवळजवळ दुप्पट होऊ शकतं. या ४० वर्षांच्या व्यक्तीचं म्हणणं आहे की, ३० मिनिटांची झोप त्याच्यासाठी पुरेशी आहे. ऐवढा कमी वेळ झोपत असूनही तो दिवसभर पूर्ण उर्जेनं काम करतो. त्याच्या दैनंदिन कामांमध्ये जिममध्ये जाणे, खाणे, काम करणे आणि प्रवास करणे इत्यादींचा समावेश आहे.
दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, डेसुके होरी असे या जपानी व्यक्तिचं नाव आहे. डेसुके होरीने दावा केला आहे की तो १२ वर्षांपासून दिवसातून फक्त ३० मिनिटे झोपतो. पश्चिम जपानमधील ह्योगो प्रीफेक्चरमध्ये राहणारा होरी म्हणाला की, त्यानं त्याचं शरीर आणि मेंदू ३० मिनिटांच्या झोपेशी जुळवून घेतला आहे. या दिनचर्येमुळे त्यांची कामाची क्षमता सुधारली असल्याचा दावाही त्यांनं केला. होरी म्हणाला, "तो नक्कीच खेळण्याच्या किंवा खाण्याच्या एक तास आधी कॉफी पितो, यामुळे त्याला झोप दूर ठेवण्यास मदत मिळते.
होरी हा व्यवसायानं व्यापारी आहे आणि दीर्घ झोपेपेक्षा चांगली झोप घेणे चांगले आहे, असं त्यांचं मत आहे. त्यानं स्पष्ट केलं, "ज्या लोकांना त्यांच्या कामावर सतत लक्ष केंद्रित करण्याची गरज असते, त्यांना दीर्घ झोपेपेक्षा चांगल्या झोपेचा अधिक फायदा होतो. उदाहरणार्थ, डॉक्टर आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा विश्रांतीचा कालावधी कमी असतो. परंतु असे असूनही ते त्यांच्या कामात उर्जेने भरून काम करतात.
फक्त ३० मिनिटे झोपल्याच्या होरीच्या दाव्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी, जपानच्या योमिउरी टीव्हीने 'विल यू गो विथ मी?' नावाच्या रिॲलिटी शोमध्ये रिॲलिटी चेक केली. होरीचे तीन दिवस निरीक्षण करण्यात आले आणि शोमध्ये असे दिसून आले की तो दिवसभरात फक्त २६ मिनिटे झोपला होता. असे असूनही तो दिवसभर पूर्ण उर्जेने काम करत राहिला. त्याने नाश्ता केला, तो जिमला गेला, फिरला आदी गोष्टी त्याने या कालावधीत केल्या. होरीने २०१६ मध्ये जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशन देखील सुरू केलं. येथे तो लोकांना चांगली झोप आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावं याचे वर्ग घेतो. २१०० हून अधिक लोक त्यांच्या वर्गात चांगली झोप आणि आरोग्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत.