मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  millennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! रेल्वे प्रशासनानं झटकले हात

millennium express news : रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! रेल्वे प्रशासनानं झटकले हात

Jun 27, 2024 10:35 AM IST

millennium express accident news : रेल्वे प्रवासात मधल्या बर्थची साखळी निसटून तो खाली कोसळल्याने खालच्या सीटवर असलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! बर्थ चांगला होता म्हणत रेल्वेनं झटकले हात
रेल्वे प्रवासात मधला बर्थ कोसळून खालील प्रवाशाचा मृत्यू! बर्थ चांगला होता म्हणत रेल्वेनं झटकले हात

Indian Railway news : रेल्वेत प्रवासात मधल्या बर्थची साखळी चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे बर्थ खाली कोसळून केरळमधील एक ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या बाबत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) बुधवारी माहिती दिली. ही घटना मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये १६ जून रोजी घडली. या प्रकरणी रेल्वे प्रशासाने हात झटकत सीट चांगली असल्याचे स्पष्ट केले आहे.

अली खान सी.के. असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली हे १६ जून रोजी त्यांच्या मित्रासोबत ट्रेन क्रमांक १२६४५ 'एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्स्प्रेस'ने प्रवास करत होते. ते स्लीपर कोचच्या खालच्या बर्थवर झोपले होते. ते आग्रा येथे जात होते. दरम्यान, ही गाडी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातजात असताना अचानक वरच्या बर्थची साखळी सुटली आणि मधला बर्थ हा खाली कोसळला. या घटनेत अली यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मानेला जखम झाली होती. त्यांना सुरुवातीला रामागुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २४ जून रोजी उपचारादरम्यान अली यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मिलेनियम एक्सप्रेसमधील एस-६ कोचच्या सीट क्रमांक ५७ (खालच्या बर्थ) मध्ये प्रवास करता असतांना मधला बर्थ कोसळल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

पोस्टमध्ये लिहिले होते, 'प्रवाशाने मधल्या बर्थच्या सीटची साखळी व्यवस्थित न लावल्यामुळे सीट खाली कोसळली. ही सीट खराब नव्हती, असे रेल्वेने एक्स पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. निजामुद्दीन स्टेशनवर सीट तपासली असता ती व्यवस्थित असल्याचे आढळले असे स्पष्टीकरण देखील रेल्वेने दिले आहे.

या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना दक्षिण रेल्वेने सांगितले की, माध्यमात मधला बर्थ खराब स्थितीत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. संबंधित प्रवाशाने मधला बर्थची साखळी नीट न लावल्यामुळे मधला बर्थ अचानक खाली कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना झाली, असे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या चुकीच्या देखभालीमुळे मधला बर्थ खाली पडला नाही किंवा रेल्वेच्या चुकीमुळे अपघात झाला नाही. गाडीची सीट खराब असल्याच्या बातम्या निराधार व दिशाभूल करणाऱ्या आहेत. हजरत निजामुद्दीन येथील मधल्या बर्थ तपासणी करण्यात आली. यात तो चांगला असल्याचे आढळून आल्याचे देखील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भारतीय रेल्वेने मृतव्यक्तीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर