Traffic Challan on Sleepers : देशात रस्ते वाहतुकीसंदर्भात अनेक नियम आहेत. हे नियम पाळणे बंधनकारक आहे. हे नियम न पाळल्यास अनेकांना दंड देखील होऊ शकतो. जर बाईकवर लुंगी, किंवा चप्पल घातल्यास दंड भरावा लागेल अशा काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या बातम्यासंदर्भात खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केला आहे.
देशात विविध प्रकारचे वाहतूक नियम आहेत. बाईक किंवा कार चालवतांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. रस्ते वाहतुकीदरम्यान अपघात कमी करण्यासाठी वाहनधारकांसाठी खास सूचना देखील वाहतूक विभागातर्फे करण्यात येत असतात. जर या नियमांचे पालन केले नाही तर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. या नियमांचे पालन न केल्यास प्रसंगी परवाना देखील रद्द होऊ शकतो. दुचाकी चालवतांना हेल्मेट घालणे गरजेचे आहे. पण, जर तुम्ही चप्पल किंवा लुंगी घालून दुचाकी किंवा कार चालवत असल्यास दंड भरावा लागणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. या व्हायरल बातम्यांचे सत्य खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
मोटार वाहन कायद्यात चप्पल किंवा सँडल घालून दुचाकी किंवा कार चालवू नये अशी कोणतीही तरतूद नाही. यामुळे दुचाकी किंवा कार चप्पल किंवा लुंगी घालून चालवल्यास कोणताही नियम भंग होत नाही. त्यामुळे चप्पल घालून कार किंवा दुचाकी चालवल्यास दंड लावला जात नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये चप्पल घालून दुचाकी चालवल्यास किंवा लुंगी घालून स्कूटर चालवल्यास दंड बसत नाही. चप्पल, हाफ स्लीव्ह शर्ट, लुंगी बनियान घालून गाडी चालवणे, गाडीची काच अस्वच्छ असणे किंवा गाडीत अतिरिक्त बल्ब न ठेवणे यासाठी दंड भरावा लागत नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जर गाडी चालवतांना शूज घातले तर एक्सेलेटरवर किंवा ब्रेकवर मजबूत पकड मिळते. चप्पलवर घातल्यावर ती मिळत नाही. त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी चालवतांना चप्पल ऐवजी सँडल अथवा शूज घालण्यास प्राधान्य द्यावे असे म्हटले जाते.