आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमलाच्या डोंगरावर ३२०० फूट उंचीवर असलेले भगवान वेंकटेश्वराला समर्पित तिरुपती-तिरुमला देवस्थानम (टीटीडी) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील सरकारच्या काळात म्हणजेच जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरण्यात आली होती, असा दावा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) या दाव्याच्या समर्थनार्थ प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला होता. यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
भाजपसह अनेक पक्षांनी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवल्याचा आरोप केला आहे, तर वायएसआर काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने भाजपवर षडयंत्रांतर्गत निवडणुकीच्या काळात समाजात ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला आहे. जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचे लाडू बनवताना निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि जनावरांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी म्हटले की, निवडणुकीच्या हंगामात ध्रुवीकरणाच्या कटकारस्थानांना खतपाणी घालणे भारतीय जनता पक्षाची जुनी खोड आहे.
मात्र, तिरुपती मंदिरावर हिंदूंच्या श्रद्धेवर हल्ला केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी सत्तेत असताना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली मंदिराच्या प्रांगणात येशू ख्रिस्ताच्या क्रूसासारखे आकृत्या असलेले खांब लावल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित लोकांनी याला कडाडून विरोध तर केलाच, शिवाय मंदिराच्या आवारातील वादग्रस्त आकाराच्या खांबांची तोडफोडही केली होती. याचे लोण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले होते.
२००७ मध्ये मंदिर व्यवस्थापनाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या २५० कोरीव खांबांचे डिझाइन आणि बांधकाम करण्याचे कंत्राट बेंगळुरूच्या एका कंपनीला दिले होते. व्यंकटेश्वर मंदिराच्या ब्रह्मोत्सव उत्सवात सजावट म्हणून हे खांब उभारण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. या खांबाची रचना येशू ख्रिस्ताच्या क्रूसासारखी असल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी केला होता. हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. जेव्हा हा वाद पेटला तेव्हा तिरुपती-तिरुमला डोंगराच्या पायथ्याला असलेल्या असलेल्या गावांमध्ये धर्मांतराला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता.
त्यावेळी मंदिर व्यवस्थापनाचे (टीटीडी) नेतृत्व तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते बी. करुणाकर रेड्डी यांच्याकडे होते. त्यावेळी त्यांनी मंदिरावरील मिशनरी प्रभावाचे आरोप फेटाळून लावले होते आणि स्तंभांची रचना विजयनगर साम्राज्यादरम्यान वापरल्या गेलेल्या चिन्हांपासून प्रेरित असल्याचे म्हटले होते. या साम्राज्याचा प्रतापी राजा श्रीकृष्णदेव राय याने या मंदिराचे प्रदीर्घ काळ रक्षण केले होते. आता पुन्हा मंदिरावर हिंदू धर्माशी खेळल्याचा आरोप करण्यात आल्याने मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच जगनमोहन रेड्डी यांच्या जवळच्या लोकांकडे आहे.
विशेष म्हणजे जगनमोहन रेड्डी हे स्वत:ला ख्रिश्चन समुदायाशी संबंधित मानत आले आहेत. त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्मही ख्रिश्चन रेड्डी कुटुंबात झाला. त्यामुळे या कुटुंबावर हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवल्याचा आरोप होत असतात.