Tirupati Prasad Row : देशातील सर्वात श्रीमंत व लोकप्रिय देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्याची चरबी व मासळीचं तेल वापरलं जात असल्याचं आढळून आल्यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच आता केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेतली असून आंध्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्वप्रथम हा आरोप केला होता. प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी बीफ टॅलो, लार्ड आणि फिश ऑईल वापरलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते खरं असल्याचं गुजरातच्या प्रयोगशाळेत सिद्धही झालं. त्यामुळं गोंधळात भर पडली. आता या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी अहवाल मागवला आहे.
शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 'प्रसादातील गडबडीबद्दल मला कळल्यानंतर मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांच्याकडं मी संबंधित प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. तो आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल. या संदर्भात मी राज्यातील अन्न नियामक मंडळाशी चर्चा करून याची चौकशी करणार आहे. अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असं नड्डा यांनी सांगितलं.
तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) मंदिराचा कारभार पाहणाऱ्या संस्थेनं नायडू यांचा आरोप योग्य असल्याचं म्हटलं आहे. तूप पुरवठादारांनी भेसळ तपासणीची होत नसल्याचा फायदा घेतला. प्रयोगशाळेच्या तपासणीनुसार, प्रसादात लार्ड (डुक्कराची चरबी) ची भेसळ झाल्याचं दिसून आलं आहे, असं टीटीडीच्या कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नायडू यांच्यावर निशाणा साधला आहे. 'चंद्राबाबू नायडू ही अशी व्यक्ती आहे, जी राजकीय फायद्यासाठी देवांचाही वापर करू शकते. 'वायएसआर काँग्रेसची बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे, असं वायएसआर काँग्रेसशी संबंधित एका नेत्यानं सांगितलं.
बीफ टॅलो - गाय संवर्गीय प्राण्याची चरबी. प्राण्याच्या मांडीच्या व पोटाच्या वरच्या भागाचं मांस. या भागाला वितळवून त्यापासून लिक्विड ऑईल फॅट तयार होतं. ते थंड झाल्यावर तुपासारखं घट्ट होतं. हे नंतर तुपात मिसळलं जातं.
फिश ऑईल - मासळीला शिजवून त्यापासून पाणी आणि तेल काढलं जातं आणि नंतर ते वेगळं केलं जातं. त्यात मोठ्या प्रमाणात अनसॅच्युरेटेड लिपीड्स असतात.
लार्ड - याला पोर्क म्हणताता. डुक्कर संवर्गीय प्राण्याकडून जे १०० % अनिमल फॅट मिळतं त्याला लार्ड म्हणतात. डुकराच्या मांसल भागापासून ते तयार होतं. तुपासारखं ते तरल आणि घट्ट असतं. ते एकप्रकारे वनस्पती तुपासारखं दिसतं.