तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये भेसळीचा प्रकार उघड झाल्यानंतर यावरून वाद उफाळला आहे. खास पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या या लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याचा प्रयोगशाळेचा अहवालही समोर आला आहे. मात्र या वादानंतरही लाडूच्या विक्रीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दररोज ६० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसात तिरुपतीचे १४ लाख लाडू विकले गेले आहेत. यामध्ये १९ सप्टेंबर ३.५९ लाख, २० सप्टेंबर ३.१७ लाख, २१ सप्टेंबर ३.६७ लाख आणि २२सप्टेंबर रोजी ३.६० लाख लाडूंची विक्री झाली आहे. प्रतिदिन ३.५० लाख सरासरीने लाडूंची विक्री होत आहे.
तिरुपतीच्या लाडूवरून वाद सुरू असतानाही याच्या विक्रीवर परिणाम झालेला नाही. याबाबत एका भाविकाने आपले मत व्यक्त केले आहे. वेंकटेश्वर राव नावाच्या एका भाविकाने म्हटले की, आमच्या श्रद्धेवर इतक्या आरोपांनी काहीही परिणाम होत नाही. येथे उपस्थित असलेल्या काही अन्य भाविकांनी म्हटले की, तिरुपतीच्या लाडूवरून झालेल्या वाद आता इतिहास जमा झाला आहे. या मंदिरात प्रतिदिन ३ लाख लाडू बनवले जातात. येथे येणारे भाविक बालाजीच्या दर्शनानंतर मोठ्या प्रमाणात लाडूंची खरेदी करतात. आपल्या मित्र परिवार व नातेवाईकांना देण्यासाठीही लाडू खरेदी होत असते. येते ५० रुपयांना एक याप्रमाणे हवे तितके लाडू भाविकांना दिले जातात.
तिरुपतीचे लाडू बनवण्यासाठी हरभरा डाळ, गायीचे शुद्ध तूप, साखर, काजू, मणुके आणिबदाम आदि साहित्य वापरले जाते. लाडू बनवण्यासाठी दररोज जवळपास १५ हजार किलो तूप वापरले जाते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी आरोप केला होता की, वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुपतीचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तूपात जनावरांच्या चरबीचा अंश आहे. त्यानंतर राज्य सरकारने प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
या आरोपांवर पलटवार करताना माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सत्ताधारी टीडीपीवर धार्मिक गोष्टींचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले की, टेंडर प्रक्रिया दर सहा महिन्याला राबवली जाते. योग्यतेचे मापदंड दशकांपासून बदलले नाहीत. पुरवठादारांना एक एनएबीएल सर्टिफिकेट आणि एक उत्पादनाच्या गुणवत्तेचे सर्टिफिकेट द्यावे लागते. टीटीडी तुपाचे नमूने एकत्र करते आणि केवल सर्टिफाइड प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. त्यांनी आरोप केला की, चंद्राबाबू नायडूंना खोटे बोलण्याची सवय आहे.