मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TikTok Ban : भारतानंतर या देशात टिकटॉकवर बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव उचललं मोठं पाऊल

TikTok Ban : भारतानंतर या देशात टिकटॉकवर बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव उचललं मोठं पाऊल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 24, 2023 07:17 PM IST

TikTok Ban News : टिकटॉकच्या माध्यमातून चीन लोकांचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

TikTok Ban In United Kingdom News Today
TikTok Ban In United Kingdom News Today (AFP)

TikTok Ban In United Kingdom News Today : अत्यंत कमी काळात भारतासह अनेक देशांमध्ये लोकप्रिय झालेले चिनी बनावटीचे सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकवर आता अनेक देशांनी बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. भारताचे चीन सोबत संबंध बिघडल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारनं टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता इंग्लंडमधील सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या टिकटॉकवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टिकटॉकच्या माध्यमातून चीन इंग्लंडमधील लोकांची माहिती आणि डेटा चोरत असल्याचा आरोप ब्रिटीश सरकारकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडमधील खासदारांना टिकटॉक वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता भारतासह इंग्लंडमध्येही टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यामुळं चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इंग्लंडच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात येत असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. सायबर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर आता सरकारनं सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. याशिवाय टिकटॉकला इंग्लंडच्या संसदेतील सर्व उपकरणं आणि नेटवर्कमधून ब्लॉक करण्यात येणार असल्याचंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. देशातील लोकांच्या आणि संसदेच्या सायबर सुरक्षेची काळजी घेणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे, त्यामुळंच आम्ही हा निर्णय घेतल्याचं सरकारच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे.

टिकटॉकवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचं कंझर्वेटिव्ह पक्षानंही स्वागत केलं आहे. केवळ लोकांना अथवा संसदेलाच नाही तर सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनीही टिकटॉकचा वापर करू नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. यापूर्वी भारत, नेपाळ आणि न्यूझीलंड या देशांनी टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता इंग्लंडमध्येही टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यामुळं संपूर्ण युरोपात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point