Elephant Attack: रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला ठार, एक जखमी; जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील घटना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elephant Attack: रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला ठार, एक जखमी; जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील घटना

Elephant Attack: रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला ठार, एक जखमी; जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील घटना

Dec 13, 2024 05:03 PM IST

Elephant Herd Attacks Womens: पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील जलदापारा राष्ट्रीय उद्यानात लाकूड गोळा करण्यासाठी महिलांना रानटी हत्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात ३ महिला जागीच ठार झाल्या असून एक जण गंभीर जखमी आहे.

रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला ठार, एक जखमी
रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला ठार, एक जखमी

Elephant Herd Kills 3 Women In West Bengal: पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील जलदापारा राष्ट्रीय उद्यानात हत्तीच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

चिलापाटा वनपरिक्षेत्रांतर्गत दक्षिण मेंदाबारी गावातील दहा महिलांचा गट गुरुवारी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात लाकूड गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. या भागात हत्तींचा मोठा कळप फिरत असल्याची माहिती वनविभागाने दिल्यानंतरही या महिला जंगलात घुसल्या, अशी माहिती एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने दिली.

जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील चिलापाटा परिसरात २३ हत्तींचा कळप फिरत असल्याची माहिती वनविभागाने बुधवारी दिली. जंगलाच्या सीमेवर असलेल्या गावांमधील रहिवाशांना सतर्क करण्यात आले आणि चिलापाटा जंगलात प्रवेश न करण्याचा सल्ला देण्यात आला, असे जलदापारा वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी परवीन कासवान यांनी सांगितले.

सहा महिला पळून जाण्यात यशस्वी

चिलापाटा रेंजमधील बनिया बीट येथे ही घटना घडली. सहा महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. पण तीन महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. या महिला चुकून हत्तींच्या कळपासमोर गेल्या. त्यानंतर हत्तींनी त्यांना चिरडले. हत्तींच्या हल्ल्यातून वाचलेल्या महिलांनी गावकऱ्यांना सांगितल्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनरक्षकांच्या मोठ्या पथकाने घटनास्थळी जाऊन महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमी महिलेची सुटका केली.

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

रेखा बर्मन, चांदमोनी उरांव आणि सुकर्णमोनी लोहार अशी हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. हे सर्व जण जिल्ह्यातील दक्षिण मेंडाबारी गावचे रहिवासी होते. जखमी निमा चारोवा यांना उपचारासाठी अलीपुरद्वार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

जगात सर्वाधिक आशियाई हत्ती भारतात आहेत. सध्या देशातील हत्तींची संख्या ३० हजाराच्या आसपास आहे. हे हत्ती दक्षिण भारतातील केरळपासून पूर्व भारतातील आसामपर्यंत विस्तारलेल्या या एलिफंट कॉरिडॉरमध्ये राहतात. पलामू व्याघ्र प्रकल्पात १८० हून अधिक हत्ती आहेत. एका सर्वेक्षणानुसार, भारतात हत्तींसोबत झालेल्या संघर्षामुळे दररोज सरासरी दोन लोकांचा मृत्यू होतो. २०२३ मध्ये झारखंडमध्ये हत्तींमुळे ९६ लोकांचा मृत्यू झाला. तर, संपूर्ण भारतात ६२८ लोकांचा मृत्यू झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर