देशात बेरोजगारीच्या समस्येने इतके उग्र रुप धारण केलय की उच्चविद्याविभूषित तरुणांच्या हातात काम नसल्याचे चित्र देशाच्या अनेक भागात दिसून येत आहे. त्यामुळे देशात अनेक बेरोजगार तरुण त्यांच्या मनाविरुद्ध वाट्टेल ती नोकरी स्वीकारण्यास तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हरयाणामध्ये विविध सरकारी विभाग आणि महामंडळांमध्ये काम करण्यासाठी शासनाकडून कंत्राटी पद्धतीवर १५ हजार रुपये महिना पगारावर भरण्यात येत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या पदासाठी लाखापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. या अर्जांमध्ये चक्क पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. हरयाणा कौशल्य रोजगार महामंडळ (HKRN) कडून ६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी भरतीसाठी वेबसाइटच्या माध्यमातून राज्यभरातून अर्ज मागवण्यात आले होते. यादरम्यान महामंडळाला एकूण १ लाख ६३ हजार २७९ अर्ज प्राप्त झाले. या अर्जदारांमध्ये सर्वाधिक अर्ज हे बारावीपर्यंत शिकलेल्या १ लाख १७ हजार १४४ तरुण अर्जदार आहेत. तर ३९,९९० जणांचे शिक्षण पदवीपर्यंत आणि ६,११२ जणांचे शिक्षण हे पदव्युत्तर पदवीपर्यंत झाल्याचे दिसून आले आहे.
सफाई कर्मचारी पदासाठी पदवीधारक आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने अर्ज केल्यामुळे कर्मचारी निवड समितीच्या सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘नोकरीच्या जाहिरातीमध्ये केलेल्या वर्णनात निवड झालेल्या लोकांकडून अपेक्षित असलेल्या कामाची रुपरेषा स्पष्टपणे मांडण्यात आलीय. यातील काही लोकांनी नोकरीसाठी चुकून अर्ज केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.' अशी प्रतिक्रिया हरियाणा कौशल्य रोजगार महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
‘एचकेआरएनच्या वेबसाइटवर सफाई कर्मचारी म्हणून अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिक जागा, रस्ते आणि इमारतींमध्ये जमा झालेला कचरा साफ करणे, कार्यालयाची स्वच्छता करणे आणि कचरा फेकणे अशा स्वरुपाच्या कामाचे वर्णन करण्यात आले आहे. अर्जदाराने कामाचे वर्णन काळजीपूर्वक वाचल्याची पुष्टी करणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. शिवाय निवड झाल्यास त्यांची नेमणूक त्यांच्या गृहजिल्ह्यातच केली जाईल, अशी संमतीही त्यांना द्यावी लागते.’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान ‘हिंदुस्तान टाइम्स’ने सफाई कामगार पदांसाठी अर्ज केलेल्या सात पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांशी संवाद साधला. बेरोजगारी आणि आर्थिक ताण यामुळे त्यांनी सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज केल्याचे सांगितले. तर काहींनी सरकारी नोकरीच्या आमिषाने अर्ज केल्याचे सांगितले.
रचना देवी (वय २९) ही तरुणी सिरसा या शहराची रहिवासी आहेत. तिने नर्सरी शिक्षक प्रशिक्षण विषयात पदवी शिक्षण घेतले असून राजस्थानमधील एका विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहे. गेले चार वर्ष बेरोजगार असल्याचे रचना देवी हिने सांगितले. ‘मी बेरोजगार असल्याने सध्या घरीच आहे. बाहेर नोकरी नाही. म्हणून मी सफाई कामगार म्हणून अर्ज केला’ असं या तरुणीने सांगितले.
मनीषा (वय ३१ वर्ष) आणि तिचा पती दानिश कुमार (वय ३१) हे जोडपं चरखी दादरी येथे राहतं. हे दोघेही बीएड पदवीधारक आहेत. दानिश कुमार म्हणाले, ‘आम्ही गेले अनेक वर्ष बेरोजगार आहोत. मी कॉम्प्युटर ऑपरेटर आणि हरयाणा रोडवेज बस कंडक्टरच्या नोकरीसाठीही अर्ज केला आहे. मी संगणक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला असल्याने कॉम्प्युटर ऑपरेटरच्या नोकरीसाठी योग्य आहे. सध्या लॅपटॉपवर लोकांचे ऑनलाइन फॉर्म भरून मी थोडी कमाई करतो’ असं कुमार म्हणाले. दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या फतेहाबाद येथील सुमित शर्मा (वय ३४) यानेही सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज केला आहे. यापूर्वी त्याने वैद्यकीय वस्तू विक्रीच्या व्यवसायात हात आजमावले होते. परंतु त्या व्यवसायात तोटा झाल्याने सध्या तो फोटो कॉपीर म्हणून काम करतो.
बहादूरगड येथील राहुल ढेनवाल (वय ३१) याने बीएड पर्यंतचे शिक्षण घेतले असून ग्रंथालय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेताय. राहुल सध्या बेरोजगार आहे. याच निराशेतूनच त्याने सफाई कामगार पदासाठी अर्ज केल्याचे सांगितले. जींद शहरात राहणारा अजित कौशिक (वय २७) हा बारावीपर्यंत शिकला असून तो सध्या ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करतो. लग्नासाठी आपल्याला सरकारी नोकरीची गरज असल्यामुळे सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज केल्याचे त्याने सांगितलं.
१६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार हरियाणाच्या शहरी भागात १५ ते २९ वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचा दर एप्रिल ते जून २०२४ तिमाहीत वाढून ११.२ टक्के झाला आहे. हा बेरोजगारीचा दर जानेवारी ते मार्चमध्ये ९.५ टक्के होता.
पीएलएफएसच्या आकडेवारीनुसार हरयाणात शहरी भागात राहणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर एप्रिल-जूनमध्ये वाढून १७.२ टक्के झाला आहे, जो जानेवारी-मार्चमध्ये १३.९ टक्के होता. शहरी भागातील सर्व वयोगटातील बेरोजगारीचा दरजानेवारी-मार्चमधील ४.१ टक्क्यांवरून एप्रिल-जूनमध्ये ४.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.