हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतला चंडीगड एअरपोर्टवर थप्पड़ मारणाऱ्या CISF जवान कुलविंदर कौरच्या समर्थनार्थ लोक पुढे येत आहेत. तसेच काही लोक या घटनेचा निषेध करत आहेत. दुसरीकडे कुलविंदरला पोलिस कोठडीतून मुक्त करण्यासाठी लोक आंदोलनही करत आहेत. आता थानथाई पेरियार द्रविदार कळघम (TPDK) पार्टीने कुलविंदर कौर साठी एक सोन्याची अंगठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या रिंगमध्ये पेरियारचा फोटोही लावला आहे.
TPDKमहासचिव केयू रामाकृष्णन यांनी शनिवारी म्हटले की, आम्ही महिला जवानाला ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी पाठवणार आहोत. आम्हाला वाटते की, शेतकऱ्यांसाठी निर्भयपणे उभी राहिलेल्या महिलेचा सन्मान करावा. थप्पड मारल्यानंतर कुलविंदर कौरने म्हटले होते की, कंगनाने आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांसाठी अपमानजनक शब्दांचा वापर केला होता. त्या आंदोलनात कुलविंदरची आईही बसली होती.
रामाकृष्णन यांनी म्हटले की, आम्ही कुलविंदर कौरच्या घरच्या पत्त्यावर अंगठी पाठवणार आहे. जर त्यांनी कुरिअर स्वीकारले नाही तर आमचा प्रतिनिधी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देईल. त्याचबरोबर पेरियारची काही पुस्तकेही गिफ्ट करेल. रविवारी मोहाली येथे सीआयएसएफ जवानाच्या समर्थनार्थ रॅली काढली गेली होती. लोकांनी मागणी होती की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कौर यांच्याविरोधातील एफआयआर रद्द केला जावा. मोहाली पोलिसांनी तीन सदस्यीय एसआयटी गठित करून एसपी हरबीर सिंह अटवाल यांच्या नेतृत्वात ही टीम चौकशी करणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी म्हटले होते की,CISF जवान कुलविंदर कौर हिने कंगनाला रागाच्या भरात थप्पड मारली असेल. जे झाले त्याबद्दल आम्हालाही खेद आहे. कुलविंदर कौरचे धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंजाबमध्ये काही ठिकाणी कुलविंदर कौरच्या समर्थनार्थ लाडूही वाटले गेले.
शेतकरी संघटनांनीही कुलविंदर कौरचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे. ७ जून रोजी कंगना रणौत दिल्ली जाण्यासाठी चंडीगड एअरपोर्टवर आली असताना तेथे सुरक्षेसाठी तैनात सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने तिला थप्पड मारली होती.