YesMadam viral news : घरच्या घरी ब्युटी सर्व्हिसेस देणाऱ्या येसमॅडम या स्टार्टअप कंपनीने विचित्र पद्धतीनं सर्वे करत कंपनीत नोकरकपातीचं धोरण राबावलं. कंपनीने ‘कामामुळं तुम्ही तणावाखाली आहात का’, असा सर्व्हे करून 'हो' म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. यामुळे कंपनीवर मोठी टीका झाली होती. दरम्यान, तणावातही काम करता येतं असं म्हणत या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एका कंपनीने जॉब ऑफर केला आहे.
नोएडा सेक्टर-६३ मधील 'येस मॅडम' या होम सलून सर्व्हिस प्रोव्हायडरकंपनीत १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. कंपनीच्या एचआरच्या वतीने असा सर्व्हे करून 'हो' म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. मात्र, कंपनीने या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान, गुरुग्राममधील एका कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या कंपनीचे दरवाजे उघडले आहेत. अॅप मॅजिकपिन असे या कंपनीचे नाव असून ही तिसरी सर्वात मोठी फूड डिलिव्हरी कंपनी आहे. मॅजिकपिनने येस मॅडम कंपनीने काढून टाकण्यात आलेल्या लोकांचे अर्ज मागवले आहेत व त्यांना जॉब ऑफर केला आहे.
लिंक्डइनवर मॅजिकपिनचे क्रिएटिव्ह डायरेक्टर माधव शर्मा यांनी लिहिलं की, "ही कर्मचारी भरती मोहीम कोणत्याही तणावाशिवाय करण्यात आली आहे. त्यांनी मॅजिकपिनच्या दोन कर्मचाऱ्यांचा हाती बोर्ड देत त्यांचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे की, "नाही मॅडम, कर्मचारी तणावाखालीही चांगली कामं करू शकतात; कारण कंपनी त्यांची चांगली काळजी घेते. तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती असलेल्या बोर्ड वर लिहिलं होत की, मॅजिकपिन ज्यांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना जॉब ऑफर करत आहे.
येसमॅडमच्या एका कर्मचाऱ्यानं लिंक्डइनवर या कथित ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. कंपनीनं नोकरीवरून काढलेल्या १०० कर्मचाऱ्यांमध्ये माझा देखील समावेश आहे, असं या कर्मचाऱ्यानं म्हटलं होतं. त्यानं शेअर केलेला येसमॅडम कंपनीच्या ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंपनीने १०० जणांना कामावरून काढून टाकण्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. लिंक्डइनवर एका कर्मचाऱ्याने लिहिलं, "येस मॅममध्ये काय चाललंय. आधी तुम्ही सर्व्हे केला आणि मग अचानक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. येस मॅडम कंपनीच्या या निर्णयावर सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी मोठी टीका केली आहे.
संबंधित बातम्या