Railway Station Viral Video : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवर चोरट्यांपासून सावध राहण्याच्या सूचना अनेकदा करण्यात येत असतात. परंतु प्रवाशांनी कितीही काळजी घेतली तरी चोरटे त्यांच्या खिशातील लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास करण्यात यशस्वी होतात. कधी सामान तर कधी महागड्या वस्तू हिसकावून चोरटे धावत्या रेल्वेतून उडी मारत असतात. त्यातच आता प्रवाशांच्या खिशातून मोबाईलची कशी चोरी केली जातेय, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
रेल्वे पोलिसांनी एक व्हिडिओ शेयर करत तुमचा मोबाईल कशा पद्धतीने चोरला जातोय, हे दाखवून दिलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत रेल्वे स्थानकावर काही प्रवासी झोपलेले दिसून येत आहे. त्याचवेळी शेजारी झोपलेल्या एका तरुणाने हळूवार प्रवाशाच्या खिशातून मोबाईल काढत घटनास्थळावरून पळ काढला आहे. चोरटा झोपण्याचं नाटक करत असून त्याचं धक्कादायक कृत्य रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यानंतर आरपीएफ इंडियाने मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
रेल्वेतून प्रवास करत असताना अनेकदा प्रशासनाकडून मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत असतं. तसेच गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात येतो. परंतु रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेत प्रवास करत असताना प्रवाशांनी आपल्या सामानांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. एक चूक तुम्हाला लाखो रुपयांचा चूना लावू शकते. हे रेल्वेने शेयर केलेल्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळं आता रेल्वेत प्रवास करत असताना अधिकची काळजी घेण्याचं आवाहन आरपीएफ इंडियाकडून करण्यात आलं आहे.