Uttar Pradesh Crime : लखनौमधील अयोध्या महामार्गावरील इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठा दरोडा पडला. दरोडे खोरांनी तीन तासांत बँकेतील ३० लॉकर तोडून कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या नाईट झोनल पोलिसिंगचा पर्दाफाश या घटनेमुळे झाला. आयुक्तांनी स्थापन केलेले नाईट झोनल पोलिसिंग पथक सक्रिय असते तर एवढी मोठी घटना घडली नसती. दुसरीकडे बँकेत सुरक्षेसाठी लावण्यात आलेला सायरन देखील खराब असल्याचे पुढे आले. त्याचबरोबर बँकेत सुरक्षा रक्षक देखील नसल्याचं पुढं आलं आहे. दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी बँकेत बसवलेले एसीचे आऊटडोअर युनिट देखील चोरून नेले आहे. याआधीही एटीएम फोडण्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत.
रात्री होणारे गुन्हे कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी एक एडीसीपी आणि दोन एसीपींची नेमणूक केली होती. आयुक्तांनी तयार केलेल्या एसओपीमध्ये रात्रीच्या वेळी घडणारे गुन्हे रोखण्यासाठी एक अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ऑपरेशनल कमांडर) आणि दोन सहाय्यक पोलिस आयुक्त (असिस्टंट ऑपरेशनल कमांडर) यांची नेमणूक केली होती. तसेच गस्तीसाठी विशेष पथक देखील तयार करण्यात आले होते. सकाळी ११ ते ६ या वेळेत हे अधिकारी कार्यरत राहणार असून रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात अतिरिक्त निरीक्षक, गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर ऑपरेशनल कमांडर लक्ष ठेवणार होते. हे तिन्ही अधिकारी झोनल चेकिंग करणार असून त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार, गुन्हेगारी घटना घडल्यास तत्काळ कारवाई केली जाणार होती. मात्र, असे असतांनाही चोरट्यांनी बँकेत मोठा दरोडा टाकून येथील कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.
बँकेतील लहान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या लॉकरचे भाडे एक ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. त्याच भाड्याच्या १०० पट विमा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कायदा २०२१ नुसार बँकेच्या लॉकरचे भाडे वर्षाला १००० ते ४००० रुपयांच्या दरम्यान आहे. लॉकरमध्ये किती आणि कोणते दागिने ठेवले आहेत? बँक कर्मचाऱ्यांना याची माहिती नसते. ही माहिती केवळ ग्राहकालाच असते. ग्राहक आपल्या लॉकरमध्ये हवे तेवढे दागिने ठेवू शकतो. बँकेत एखादा अपघात किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास या कायद्यानुसार भाड्याच्या रकमेच्या केवळ १०० पट रक्कम ग्राहकाला दिली जाणार आहे. त्याच्या दागिन्यांच्या किमतीची भरपाई बँक करणार नाही.
कोट्यवधींच्या चोरीत बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही समोर आला आहे. बँकेतील सिक्युरिटी सायरन खराब झाला होता. खरे तर सायरन वाजल्यास पोलिस ठाण्याला वेळेत माहिती मिळायची. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच एवढी मोठी घटना घडली. यासंदर्भात एडीसीपी पंकज सिंह यांनी बँक मॅनेजरला सायरनबाबत विचारले असता चोरट्यांनी सायरन उखडून टाकल्याचे बँक मॅनेजरने सांगितले.
संबंधित बातम्या