पॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस आला प्रकार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस आला प्रकार

पॉश सोसायटीच्या परिसरात आढळला मुलीचा कुजलेला मृतदेह, कुत्रे कवटी घेऊन फिरताना उघडकीस आला प्रकार

Nov 10, 2024 09:22 PM IST

भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाच्या शरीराचे लचके तोडले होते आणि कवटी धडापासून वेगळी केली होती. मुलीचा चेहराही पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता. ही बातमी समोर येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मुलीचा मृतदेह आढल्याने खळबळ
मुलीचा मृतदेह आढल्याने खळबळ (HT Photo)

छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका पॉश भागात एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून खूपच खराब स्थितीत आहे.  मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. कुत्रा मुलीची कवटी घेऊन फिरताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना राजेंद्र नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

बांधकाम सुरू असलेल्या इमारत परिसरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोरील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. तिथे एक मानवी कवटी पडलेली होती. कवटीभोवती भटकी कुत्रीही फिरत होती. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, त्यांना एक कुत्रा केस तोंडात पकडून कवटी रस्त्यावर आणताना दिसला. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली. त्यानंतर इमारतीच्या आतील भागाची पाहणी केली असता आतून दुर्गंधी येऊ लागली.

अर्धनग्न अवस्थेत होता मुलीचा मृतदेह -

अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या मुलीचा कुजलेला मृतदेह इमारतीत मोठ्या ढिगाऱ्याखाली पडून होता. पोलिसांनी ढिगारा हटवला असता तेथे एका मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचा बराचसा भाग कुजला होता. तेथे असलेले पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावले.  भटक्या कुत्र्यांनी तरुणीच्या शरीराचे लचके तोडले होते व शीर धडापासून वेगळे केले होते. त्यामुळे मृत मुलीची ओळख पटलेली नाही. चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला असल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत.

बलात्कार करून हत्या केल्याचा संशय -

मृत मुलीचे वय २५ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या आधारे मुलीवर बलात्कार झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, बलात्कार झाला की नाही याची खातरजमा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होणार आहे. इमारतीतील काम बंद असल्याने फारशी माहिती समोर आलेली नाही. ही मुलगी कोण होती आणि तिची हत्या कोणी आणि का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर