Viral News : भारताचे शेजारी राष्ट्र श्रीलंकेला पुन्हा एकदा विजेच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. गेल्यावेळी ऊर्जेच्या संकटामुळे लाइट गेली होती. मात्र, या वेळी संपूर्ण देशातील लाइट जाण्याचे कारण हे ऊर्जा संकट नाही तर काही तरी वेगळेच आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना व्हायरल झाली आहे. अनेक देशातील नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
श्रीलंकेत वीज गेल्याचे कारण हे ऊर्जा संकट नसून माकडं ठरली आहेत. श्रीलंकेच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीड सबस्टेशनमध्ये रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एक माकड घुसलंन. ज्यामुळे वीज गेली आणि संपूर्ण देशाचा वीजपुरवठा खंडित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार तास उलटूनही वीज सेवा पूर्णपणे पूर्ववत झालेली नव्हती.
ऊर्जामंत्री कुमारा जयकोडी यांनी पीटीआयला सांगितले की, दक्षिण कोलंबोच्या उपनगरात एक माकड ग्रीड ट्रान्सफॉर्मरमध्ये घुसले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेतमोठा बिघाड निर्माण झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी अभियंते पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत. लवकरच वीजसेवा पूर्णपणे पूर्ववत होईल, अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत काही भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परंतु उर्वरित भागात किती दिवस वीज गायब राहणार याची कोणतीही माहिती नाही. सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डानेही आपल्या वेबसाईटवर या घटनेची नोटीस टाकली आहे. देशभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणामुळे देशातील जनतेची जी गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. आपल्या संयमाबद्दल सर्वांचे आभार. मात्र, वीज मंडळाने घटनेचे कारण सांगितलेले नाही.
श्रीलंकेत सध्या वीज पूर्ववत करण्यासाठी अभियंत्रे काम करत आहे. मात्र, अजूनही काही राज्यातील वीज पुरवठा हा सुरळीत होऊ शकला नाही. अनेक जिल्हे हे अंधारात आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. जेव्हा नागरिकांना या बिघाडाचे कारण समजले तेव्हा त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
या घटनेवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीलंकेतील वीज केंद्र असुरक्षित असल्याचे काही जणांनी म्हटलं आहे. तर एक माकड काय काय करू शकतं याचा प्रत्यय श्रीलंकेच्या नागरिकांना आल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनेक भागात अजूनही अंधार असून नागरिक वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संबंधित बातम्या