atishi marlena Delhi CM : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसतं हे महत्त्वाचं नाही. कारण, दिल्लीच्या जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्याकडं पाहून कौल दिला आहे. निवडणूक होईपर्यंत आमच्यापैकी एक जण खुर्चीवर बसेल. प्रभू रामचंद्रांच्या अनुपस्थितीत भरतानं जसं राज्य केलं, तसंच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री राज्यकारभार पाहतील, असं आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
कथित मद्य घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर व तुरुंगवास भोगावा लागल्यानंतर केजरीवाल यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनता पुन्हा आम्हाला प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आतिशी यांची नव्या मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, भारद्वाज यांनी वरील विधान केलं आहे.
'जोपर्यंत अरविंद केजरीवाल पुन्हा निवडून येत नाहीत, तोपर्यंत नवा मुख्यमंत्री या पदावर कायम राहील. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसतं हे महत्त्वाचं नाही कारण जनादेश अरविंद केजरीवाल यांना मिळालेला आहे. जनतेनं अरविंद केजरीवाल यांना निवडून दिलं आहे. पुढची पाच वर्षे ही खुर्ची अरविंद केजरीवाल यांचीच आहे. रामायण काळात भरतानं जसं राज्य केलं तसंच नवा मुख्यमंत्री करेल, असं भारद्वाज एएनआयशी बोलताना म्हणाले. पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी देखील हीच भूमिका मांडली.
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषद घेतली. अरविंद केजरीवाल हे आज दुपारी साडेचार वाजता नायब राज्यपालांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा त्यांच्याकडं सोपवतील आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा प्रस्तावही मांडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशी यांच्या निवडीवर टीका केली आहे. 'आजचा दिवस दिल्लीसाठी खूप दुःखद आहे. जिच्या कुटुंबानं दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी लढा दिला, अशआ महिलेला आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं जात आहे. आतिशी यांच्या आई-वडिलांनी दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला होता. अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटाचा भाग म्हणून गोवण्यात आलं होतं, असं त्यांचं मत होतं याकडं मालिवाल यांनी लक्ष वेधलं. आतिशी मार्लेना या फक्त 'डमी सीएम' असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो, असंही त्यांनी म्हटलं आहे.